भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये आपापसात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) याबाबत स्पष्टीकरण देणारे ट्विट केले आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्यांना सलग दोन सामने गमवावे लागले आहेत. पाकिस्तान संघात असलेल्या वादामुळेच त्यांचा खेळ खराब झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
भारतीय संघ सेमी फायनलमध्ये! आता ३ जागांसाठी ९ जणांमध्ये शर्यत; जाणून घ्या समीकरण
पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट संघात अंतर्गत कलहाच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या चर्चा ठामपणे नाकारतो. मीडियाच्या एका विशिष्ट विभागाद्वारे प्रसारित केलेल्या अफवांवर पीसीबी तीव्र नाराजी व्यक्त करते. पाकिस्तानी संघ एकसंध आहे आणि या निराधार दाव्यांचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नाही.''
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर वरिष्ठ खेळाडूंमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पाकिस्तान संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये तणावाची ही पहिलीच वेळ नाही. आशिया कप २०२३ मधून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर शाहीन आफ्रिदी आणि बाबर आजम यांच्यातील वादाच्या बातम्या समोर आल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आपल्या खेळाडूंवर चिडला होता.
“खुद को ज्यादा सुपरस्टार्स ना समझें, वर्ल्ड कप सर पे है. अगर हम एक होकर खेलते तो सामना जीत सक्ते थे,” असे बाबरने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले होते. तेव्हा शाहीनने हस्तक्षेप केला आणि किमान चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक कर असे म्हटले. त्यावर बाबरने उत्तर दिले की "कोण चांगली कामगिरी करत आहे आणि कोण नाही" याची मला जाणीव आहे.