वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी आणि वन डे संघ BCCI कडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला पुन्हा उप कर्णधारपद दिले गेले, तर चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले. या व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंनाही कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे, परंतु पुन्हा एकदा सर्फराज खानला ( Sarfaraz Khan) वगळण्यात आले.
मुंबईकडून खेळणारा सर्फराज खान २०२० पासून सातत्याने चांगला खेळत आहे. गेल्या मोसमात त्याने ६ सामन्यांत तीन शतकं झळकावताना ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या होत्या. २०२१-२२ हंगामात ६ सामन्यांत १२२.७५ च्या सरासरीने ९८२ धावा आणि २०१९-२० हंगामात ६ सामन्यांत १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा त्याने केल्या. तीन हंगामात त्याने १० शतकांसह २४६६ धावा केल्या आहेत. तरीही त्याला विंडीज दौऱ्यावर कसोटी संघात न निवडल्याने भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याने बीसीसीआयवर टीका केली आहे.