लंडन - नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाई हिने मंगळवारी असर मलिक याच्यासोबत विवाह केल्याची घोषणा केली आहे. मलाला हिला २०१४ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ती केवळ १७ वर्षांची होती. आता मलालाचा पती कोण आहे याविषयी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आले. मलालाचा पती असर मलिक कोण आहे आणि त्याचे पाकिस्तान क्रिकेटशी काय खास नाते आहे ते जाणून घेऊयात.
एकीकडे मलाला जगभरात सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. तर तिचा पती असर मलिक हा क्रीडा जगताशी संबंधित आहे. मलिकच्या लिंक्डइन पेजनुसार असर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये हाय परफॉर्मन्स जनरल मॅनेजर आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर वेवगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमधील त्याचे फोटोही उपलब्ध आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डासोबत काम करण्यापूर्वी असर हा प्लेअर मॅनेजमेंट एजन्सीचे व्यवस्थापन संचालक होता. तसेच लास्ट मॅन स्टँड क्रिकेट लीगमध्ये तो एका संघाचा मालकही होता. पाकिस्तानमध्ये क्रिकेट पायाभूत पातळीवर पुनरुज्जीवित व्हावे, हे माझे ध्येय आहे, तसेच प्राथमिक स्तरावर खेळाडूंना चांगली संधी मिळावी, असे असरने सांगितले होते. असरने लाहोर विद्यापीठामधून शिक्षण घेतले आहे. लिंक्डइन पेजनुसार २००८ ते २०१२ या काळात तो विद्यार्थी होता. त्याने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेतली होती. तसेच थिएटर प्रॉडक्शन करणाऱ्या ड्रामालाइनचाही तो अध्यक्ष होता.
ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या मलालाने मंगळवारी सांगितले की, त्यांनी असरसोबत मंगळवारी निकाह केला. या कार्यक्रमात कुटुंबीय आणि नातेवाईक सहभागी झाले होते. आज माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस आहे, असर आणि माझा आज निकाह झाला आहे, असे सांगत मलालाने काही फोटो ट्विट केले होते.