Join us  

Maldives Controversy: सर्वप्रथम भारतातीलच पर्यटनाला प्राधान्य द्यायला हवं; धोनीचं 'देशप्रेम', Video Viral

Maldives Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेली विधानं चर्चेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 5:00 PM

Open in App

मालदीवच्या तीन मंत्र्यांची वादग्रस्त विधानांप्रकरणी हकालपट्टी झाली असली तरी वाद अद्याप कायम आहे. भारतीयांच्या भावना दुखावल्यामुळं विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मालदीव विरोधात आवाज उठवला. तसेच अनेकांनी आपल्या देशातील पर्यटनाला पाठिंबा द्यायला हवा, असं आवाहन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबद्दल अपमानजक भाषा वापरल्यामुळं मालदीव सरकारमधील मंत्र्यांचा निषेध केला जात आहे. वादग्रस्त विधानांमुळं मालदीव मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांसह क्रीडा विश्वातील दिग्गजांनी मालदीवमधील प्रमुख व्यक्तींच्या विधानाविरोधात आवाज उठवला. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅप्टन कूलचं देशप्रेम दिसते.

मालदीव सरकारची कारवाई वाद चिघळल्यानं मालदीव सरकारनं मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारनं रविवारी आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान अशी तीन निलंबित मंत्र्यांची नावे आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टीकेच्या दरम्यान तीन मंत्र्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव विरोधात आवाज उठवल्यानंतर मालदीव सरकारनं हे पाऊल उचलले. 

मालदीव सरकारमधील मंत्र्यांनीच अपमानजनक भाषा वापरल्यानं भारतीय संतापले. कलाकारांसह खेळाडूंनी निषेध व्यक्त केला. अनेकांनी 'आत्मनिर्भर भारत'चा नारा देत देशातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आवाज उठवला. मात्र, धोनीचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला, ज्यामध्ये धोनी परदेशी पर्यटनापेक्षा देशातील पर्यटनाला प्राधान्य द्यायला हवं असं म्हणतो. 

 व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की धोनी म्हणतो, "मी केवळ सुट्टीनिमित्त नाही तर अनेकदा इतरत्र प्रवास करत असतो. खरं सांगायचं तर तर मी जास्त सुट्टीचा अर्थात Holiday प्लान केला नाही. मी क्रिकेटमध्ये सक्रिय असताना ज्या देशात जायचो तिथं फक्त क्रिकेट खेळायचो. मी परदेशी देशांमध्ये खूप काही पाहिलं नाही कारण मी केवळ क्रिकेटसाठी तिथं जायचो. क्रिकेट खेळायचं आणि परतायचं असं माझं नियोजन असायचं... पण, माझ्या पत्नीला फिरायला फार आवडतं. त्यामुळं आता आमचा एक प्लान आहे, त्यानुसार नियोजन सुरू आहे. पण आम्हाला सुट्टीची सुरूवात भारतातील पर्यटन क्षेत्रापासूनच  करायची आहे. कारण आपल्या देशात इथे खूप सुंदर ठिकाणं आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापूर्वी मला याबद्दल सांगायला नक्कीच आवडेल." 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीमालदीवपर्यटनभारत