Suresh Raina on Maldives Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेली विधानं चर्चेत आहेत. वादग्रस्त विधानांमुळे मालदीव दिवसभर चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांसह क्रीडा विश्वातील दिग्गजांनी मालदीवमधील प्रमुख व्यक्तींच्या विधानाविरोधात आवाज उठवला. भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील एक पोस्ट केली. तसेच सुरेश रैना आणि इरफान पठाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.
सुरेश रैनाने म्हटले, "मालदीवमधील प्रमुख व्यक्तींच्या टिप्पण्या मी पाहिल्या, ज्यात भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी बोलले आहे. हे पाहणं अत्यंत निराशाजनक आहे. भारत मालदीवची अर्थव्यवस्था, संकट व्यवस्थापन आणि इतर अनेक पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो. मालदीवला अनेक वेळा भेट दिल्यानंतर तेथील सौंदर्याबद्दल नेहमीच कौतुक व्यक्त केले आहे. पण मला वाटते की, आपण आपल्या स्वाभिमानाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. चला एकत्र येऊ आणि #ExploreIndianIslands निवडू या... आपल्या देशातील पर्यटन उद्योगाला पाठिंबा देऊया.
दरम्यान, वाद चिघळल्याने मालदीव सरकारने मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारने रविवारी आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान अशी तीन निलंबित मंत्र्यांची नावे आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टीकेच्या दरम्यान तीन मंत्र्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव विरोधात आवाज उठवल्यानंतर मालदीव सरकारने हे पाऊल उचलले.
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. तर, सचिन तेंडुलकरने लक्षद्वीप पर्यटनाचा प्रचार करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. "मी सिंधुदुर्गात माझा ५० वा वाढदिवस साजरा करून २५० दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत. किनारपट्टीच्या जवळ असलेल्या या शहराने आम्हाला हवे ते सर्व दिले. अप्रतिम आदरातिथ्य असलेले भव्य ठिकाण आमच्यासाठी आठवणींचा खजिना सोडला आहे. भारताला सुंदर समुद्रकिनारे आणि मूळ बेटांचा आशीर्वाद आहे. आपल्या 'अतिथी देवो भव' तत्वज्ञानाने आपल्याला शोधण्यासारखे बरेच काही आहे. खूप आठवणी तयार होण्याची वाट पाहत आहेत", असे सचिनने पोस्टच्या माध्यमातून म्हटले.