नवी दिल्ली ।
अलीकडेच भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये एक कसोटी सामना पार पडला. या सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. मात्र इंग्लंडच्या एका चाहत्याला असं करणं आता महागात पडलं आहे. बर्मिंगहॅमच्या पोलिसांनी असे अश्लील कृत्य करण्याच्या आरोपाखाली संबंधित व्यक्तीला बेड्या घातल्या आहेत. ही घटना कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी घडली होती.
बर्मिंगहॅम पोलिसांकडून अटक
भारतीय चाहत्यांनी चौथ्या दिवशी सामन्यादरम्यान वर्णद्वेषाची वागणूक मिळाल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. त्यांनी दावा केला होता की, ब्रिटेनमधील काही चाहत्यांनी त्यांच्यावर वर्णद्वेषावरून टिप्पणी केली होती. बर्मिंगहॅम पोलिसांनी आता या व्यक्तीला अटक केली असून ट्विटकरून याबाबत माहिती दिली आहे. बर्मिंगहॅम पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, "सोमवारी कसोटी सामन्यादरम्यान वर्णद्वेष, अपमानास्पद वागणूक या आरोपांखाली एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे"
वर्णद्वेषावरून केलेल्या टिप्पणीचे हे प्रकरण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. वर्णद्वेषाची बाब समोर आल्यानंतर इंग्लंडॲंण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि एजबेस्टन मैदानाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली होती आणि कारवाई करण्याचा दावा देखील केला होता. ईसीबीने एका निवेदनात म्हटले होते की, "कसोटी सामन्यात वर्णद्वेषाबद्दल झालेल्या टिप्पणीमुळे आम्हाला दु:ख झाले आहे. आम्ही एजबेस्टनमधील सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, जे प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला कोणतेच स्थान नाही."
स्टोक्सने भावनिक पोस्ट करत व्यक्त केली नाराजी
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनेही या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली होती. स्टोक्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत म्हटले, "एजबेस्टन येथे वर्णद्वेषी टिप्पणी केल्या गेल्याच्या काही बातम्या ऐकून खरोखरच निराश झालो आहे. खेळात याला कुठेच स्थान नाही, आशा आहे सर्व चाहत्यांना कसोटी मालिकेत चांगला अनुभव मिळेल आणि वातावरण एखाद्या पार्टीसारखे राहिल. हेच खरे क्रिकेट आहे"
Web Title: Man arrested for making racist remarks during India-England Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.