नवी दिल्ली - निदहास ट्रॉफीमधील श्वास रोखून धरणाऱ्या अंतिम सामना पाहताना एका चाहत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. रविवारी झालेला अंतिम सामना पाहताना अनेकांच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. अखेरच्या षटकात 12 धावांची गरज असताना शंकर फंलदाजी करताना चाचपडत होता. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना पूर्ण क्रीडाप्रेमींच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. अखेरच्या चेंडूवर कार्तिकने षटकार मारल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण गुजरातच्या वलसाडमध्ये एका 62 वर्षीय निवृत्त शिक्षकाला ह्दयविकाराचा झटका आला. प्रविण पटेल असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सामना संपल्यानंतर काही क्षणातच प्रविण पटेल वनकल गावातील आपल्या घरात कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण डॉक्टरांनी प्रविण पटेल यांना मृत घोषित केलं.
प्रविण पटेल क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहे. क्रिकेटचा कुठलाही सामना ते चुकवत नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र बसून सामना पाहत होतो. संपूर्ण कुटुंब आणि काही मित्रही तिथे उपस्थित होते. सामना संपल्यानंतर माझे वडिल लगेच भोवळ येऊन खाली कोसळले असे त्यांचा मुलगा प्रफुल्ल पटेल याने सांगितले. त्यांना ह्दयविकाराच्या आजाराचा कोणाताही त्रास नव्हता असे प्रफुल्लने सांगितले.
काय झालं होतं सामन्याच्या शेवटी -
अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. दिनेश कार्तिकने खेळलेल्या आठ चेंडूने बांगलादेशचा घात केला असे म्हणायला हरकत नाही. एकवेळ सुस्थितीत असणारा भारतीय संघ कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दडपणात आला होता. हातातील सामाना बांगलादेशच्या गोलंदाजांनी हिसकावून घेतल्याचे चित्र तयार झाले होते. नवखा विजय शंकर खेळताना चाचपडत होता तर मनिष पांडेलाही आपली चमक दाखवता येत नव्हती. अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरच्या तीन षटकात भारताला 35 धावांची गरज असताना युवा अष्टपैलू विजय शंकर दडपणाखाली ढेपाळला. यावेळी मुस्तफीझूर रहमानने टिच्चून मारा करत पहिले चार चेंडू निर्धाव टाकले, तर पाचव्या चेंडूवर विजयने लेगबायच्या जोरावर धाव घेतली. मात्र, अखेरच्या चेंडूवर स्थिरावलेला मनिष पांडे (28) बाद झाल्याने बांगलादेश मजबूत स्थितीत आला. यावेळी, शंकरच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव नजीक दिसत होता. मात्र, खेळपट्टीवर आलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकने 19व्या षटकात सर्व चित्रंच पालटले. त्याने रुबेल हुसैनच्या या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत एकूण 22 धावांची लयलूट केली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अखेरच्या षटकात 12 धावांची गरज असताना शंकर पुन्हा एकदा चाचपडला, मात्र त्याने चौथ्या चेंडूवर एक चौकार मारला. पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात शंकर झेलबाद झाला, परंतु तोपर्यंत स्ट्राइक चेंज झाल्याने कार्तिक फलंदाजीला आला आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना त्याने षटकार ठोकत भारताचा थरारक विजय साकारला. रुबेलने दोन प्रमुख बळी भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले, मात्र कार्तिकने त्याच्या एका षटकात संपूर्ण सामना फिरवला. कार्तिकने आपल्या शानदार खेळीत दोन चौकार व तान षटकार खेचले.
ते निर्णायक षटक -
- अखेरच्या षटकात भारताला 12 धावांची गरज होती. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवखा खेळाडू विजय शंकर स्ट्राईकवर होता. दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. सौम्या सरकारने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यामुळे एक धाव भारताच्या खात्यात जमा झाली.
- सौम्या सरकारने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यामुळे नवखा खेळाडू विजय शंकरवरील दबाव आणखी वाढला.
- दुसऱ्या चेंडूवर विजय शंकरने एक धाव घेतली आणि दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. दुसरी धाव घेण्यासाठी विजय शंकरने नकार दिला. त्यामुळे दिनेश कार्तिक स्ट्राईकवर राहिला.
- तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा विजय शंकर स्ट्राईकवर आला.
- अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय शंकरने शानदार चौकार ठोकला आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
- पाचव्या चेंडूवर विजय शंकर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.
- सुदैवाने अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर दिनेश कार्तिकच होता आणि विजयासाठी एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता होता. सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि मालिका भारताच्या खिशात टाकली.