मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण, पुन्हा एकदा या मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसणार नाही. वेस्ट इंडिजपाठोपाठ धोनीनं याही मालिकेतून विश्रांती देण्याची विनंती निवड समितीकडे केली होती आणि ती मान्यही झाली. धोनीची फटकेबाजी या मालिकेत दिसणार नसली तरी कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहे. कोहलीनं नेमका कोणता फोटो शेअर केला आणि त्यानं आभार का मानले?
भारतात 2016मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 4 फलंदाज 94 धावांत माघारी परतले होते. त्यांना 36 चेंडूंत विजयासाठी 65 धावांची गरज होती. त्यावेळी कोहली आणि तत्कालीन कर्णधार धोनी खेळपट्टीवर होते. त्या सामन्यात कोहलीनं 51 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 82 धावा केल्या, तर धोनी 10 चेंडूंत 3 चौकारांसह 18 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात धोनीनं कोहलीला एकेका धावेसाठी अक्षरशः पळवलं होतं. धोनीच्या चपळतेनं कोहलीला चांगलेच दमवले होते. त्यामुळेच सामन्यानंतर कोहलीनं खेळपट्टीवर गुडघे टेकले.
याच सामन्यातील त्या अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.''
Web Title: This man made me run like in a fitness test, Virat Kohli share emotional pic with MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.