नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी टी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलचा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. लखनौ सुपरजायंट्सने मनीष पांडेला संघातून रिलीज केले आहे. आता यावर मनीष पांडेने नाराजी व्यक्त केली आहे. संघ व्यवस्थापनावर मोठा आरोप करत त्याने म्हटले, त्याला रिटेन्शनच्या दिवशीच रिलीज करणार असल्याची माहिती मिळाली.
मनीष पांडेने व्यक्त केली नाराजी
भारतीय संघाच्या ताबडतोब खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये मनीष पांडेचा समावेश आहे. मात्र मागील बराच काळ तो संघाबाहेर आहे. आयपीएल 2022 मध्ये देखील तो काही खास कामगिरी करू शकला नाही. आता लखनौ सुपरजायंट्सच्या फ्रँचायझीने त्याला आगामी हंगामासाठी रिलीज केले आहे. यावर बोलताना पांडेने नाराजी व्यक्त केली. "मला एलएसजीकडून कोणताही कॉल आला नाही. ज्या दिवशी रिटेन्शन लिस्ट जाहीर झाली, त्याच दिवशी मलाही कळले की मला रिलीज करण्यात आले आहे. मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही आणि समजू इच्छितो की फ्रँचायझी मला सोडू इच्छित आहे आणि त्यांच्या कोट्यामध्ये त्यांना काही पैसे जोडायचे आहेत. कदाचित माझ्या जागी इतर खेळाडूंना संघात सामील करून घ्यायचे आहे किंवा त्यांची योजना काय आहे हे मला माहित नाही." अशा शब्दांत मनीष पांडेने फ्रँचायझीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
IPL मधील पांडेची कामगिरी
मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या आयपीएल फ्रँचायझींसाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 160 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 29.9 च्या सरासरीने 3,648 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२१.५ आहे. लखनौ सुपरजायंट्सने त्याला रिलीज केले आहे त्यामुळे आता आगामी हंगामात तो कोणत्या संघात असेल हे पाहण्याजोगे असणार आहे. मी फॉर्म आणि चांगल्या स्ट्राईक रेटसाठी मेहनत घेत असल्याचे पांडेने यावेळी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Manish Pandey expressed his displeasure after the release of the Lucknow Super Giants franchise, saying he should have made a phone call
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.