नवी दिल्ली : ‘मांकडिंगद्वारे नॉन स्ट्राइकवरील फलंदाजाला बाद करणे अयोग्य नाही. हे क्रिकेटच्या नियमानुसार योग्यच आहे. एक प्रशिक्षक म्हणून मी माझ्या गोलंदाजांना नेहमीच मांकडिंगद्वारे फलंदाजाला धावबाद करण्याचा आदेश देईन,’ असे स्पष्ट मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले.
काही दिवसांपूर्वीच भारताची फिरकीपटू दीप्ती शर्माने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात चार्लोट डीन हिला मांकडिंगद्वारे धावबाद केले होते. आयसीसीच्या नव्या नियमानुसार हे वैध आहे. मात्र, तरीही इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी हे खेळभावनेविरुद्ध असल्याचे मत व्यक्त केले होते. यावर आता शास्त्री यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. शास्त्री म्हणाले की, ‘माझे विचार स्पष्ट आहेत. कोणत्याही फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझच्या आतमध्येच राहिले पाहिजे. त्याने रेष ओलांडता कामा नये. क्रिकेट नियमानुसार जर एखादा फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी रेष ओलांडून पुढे जात असेल, तर गोलंदाजाला मांकडिंगद्वारे त्या फलंदाजाला धावबाद करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रशिक्षक म्हणून मी माझ्या गोलंदाजांना नेहमीच मांकडिंगद्वारे फलंदाजांना धावबाद करण्याचा सल्ला देईन. ही कोणत्याही प्रकारची चिटिंग नाही, तर खेळाचा नियम आहे.’
कशाला द्यायचा इशारा?शास्त्री यांनी मांकडिंगद्वारे बाद करण्याआधी फलंदाजाला क्रीझमध्ये राहण्याचा एक इशारा द्यावा, या नियमावर नाराजी दर्शवली. ते म्हणाले की, ‘फलंदाजाला चेतावणी का द्यायची? जर चेंडू टाकण्याआधी फलंदाज क्रीझ बाहेर येत असेल, तर तो चुकीच्या पद्धतीने फायदा घेत आहे. जर एका चेंडूत एका धावेची गरज असेल, तर अशा परिस्थितीत गोलंदाज मांकडिंग करणार नाही का? गोलंदाज नक्की ही संधी साधणार.’