मुंबई, दि. 16 - सलामीवीर शिखर धवनचे स्थान अजिंक्य रहाणेला मिळू शकते, असे संकेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने आज दिले आहेत. वैयक्तिक कारणामुळे धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांत खेळणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी रहाणेवर आली आहे. तर नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यामध्ये शेवटच्या सामन्यात शिखरनं माघार घेतल्यामुळे त्याला संधी मिळाली होती. पण या सामन्यात रहाणेला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेनं रोहितच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. पण वन-डेमध्ये तो नेहमीच राखीव खेळाडू बनून राहिलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता.
सरळ बॅटने फटके मारायची परंपरा तो नेहमीप्रमाणे आपल्या मुंबईच्या मातीतून शिकला आहे. मराठी खेळाडू म्हणून महाराष्ट्रीयन क्रीडाप्रेमींकडून त्याला नेहमीच भरभरुन प्रेम मिळतं. पण एक तंत्रशुद्ध फंलदाज आणि उत्तम क्रिकेटपटू म्हणून लोक त्याचे अधिक चाहते आहेत. क्रिकेट हा जेंटलमॅनचा खेळ अशी एक खास ओळख आहे. सध्याच्या भारतीय संघातील रहाणे हा या वर्गातील सर्वात वरच्या क्रमांकावरील खेळाडू आहे. 03 सप्टेंबर 2011 रोजी इंग्लंडविरुद्ध रहाणेनं वनडे पदार्पण केलं होतं. भारतीय संघात पदार्पण करुन रहाणेला सध्या सहा वर्ष झाली आहेत. या कालावधील भारतीय संघ एकूण 144 वन-डे सामने खेळला त्यात रहाणे केवळ 79 सामन्यात भारतीय संघाचा भाग होता. म्हणजेच 50% सामन्यात रहाणेला संधीच दिलेली नाही.
अजिंक्य रहाणेनं सहा वर्षात भारतात केवळ 29 वनडे सामने खेळलेत. त्यातही त्याने 31.44 च्या सरासरीने 912 धावा ठोकल्यात. ज्या भारतीय फलंदाजांनी रहाणेच्या पदार्पणापासून केलेल्या 6 व्या क्रमांकाच्या सार्वधिक धावा आहेत. याच काळात भारतीय संघ भारतात 48 सामने खेळला म्हणजे 17 सामन्यात रहाणेला संघात स्थानच देण्यात आलं नाही. बर ही संधी देताना त्याला एक सामन्यात घेतलं जातं तर दुसऱ्यात खाली बसवले जातं. एकदाही त्याला पूर्णवेळ संधी देण्यात आली नाही. खराब कामगिरी होत असतानाही सातत्यानं भारतीय संघात सर्वात जास्त संधी मिळाली ती रोहित शर्मा, सुरेश रैना आणि रविंद्र जाडेजा. ते भाग्य रहाणेला मिळालं नाही. रोहित शर्मानं गेल्या चार वर्षात आपल्या खेळामध्ये सातत्य आणलं आहे. पण त्याचा सुरुवातीच्या काळातील रेकॉर्ड पहाल तर तुम्हाला विश्वास बसेल. शिखर धवन एखाद्या मालिकेत तुफानी फलंदाजी करतो आणि पुढल्या तीन-चार मालिकामध्ये त्याची जागा पक्की होते. परंतु रहाणेची वेळ येते तेव्हा पहिला सामना संघात, दुसरा बाहेर, तिसरा 5 व्या क्रमांकावर असच काहीतरी असत. कधीकधी संघातील त्याची जागा सुद्धा फिक्स नसते. तरीही त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असते. त्याला संघात स्थान मिळेत नसेल तर त्याच्याकडून तूम्ही चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं कितीपत योग्य वाटते? याचा एकदा विचार कराच.
कसोटीचा विचार केला तर 40 कसोटी सामन्यात 47.61 च्या सरासरीने अजिंक्यनं 2809 धावा मारल्यात. कसोटीमध्ये मधल्या फळीतील फलंदाजानं 47.61 च्या सरासरीने धावा काढण्याचं महत्व लक्ष्मण किंवा गांगुलीचा कार्यकाळ अनुभवलेले खेळाडू सांगतील. मग वन-डे सामन्यात रहाणेला स्थान द्यायला नेमक माशी कुठे शिंकते? जो फलंदाज विश्वचषक किंवा परदेशी भूमीवर जबरदस्त कामगिरी करतो त्याला 11 खेळाडूंमध्ये जागा नसावी का?
सध्या सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी फिट झाली आहे तर तिसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहलीला तोड नाही. मधल्या फळीत के. एल राहुल, मनिष पांड्ये, केदार जाधव आणि धोनी हे फलंदाज आहेत. तर अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्यानं आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवल आहे. निवड समितीला सध्या नक्की काय पाहिजे हे त्यांना तर समजतंय का? कारण संघातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोटेशन पद्धतीचा अवलंब करून बाहेर बसवलं जात? मग रहाणेच्या वेळी का कोणत्या सलामीवीराला विश्रांती दिली जात नाही? 2019 चा विश्वचषक इंग्लंडमध्ये आहे आणि रहाणे परदेशात खोऱ्यानं धावा खेचतो हे निवड समितीनं लक्षात ठेवायला हव म्हणजे बरं. नाही तर प्रतिभा असूनही संधी मिळाली नाही म्हणून रहाणेचा मुरली विजय होण्यासाठी वेळ लागणार नाही. तर रहाणेनं मिळालेल्या संधीचं सोन करत आपलं नाणं खणखणीत वाजवायला हवं.