Manoj Tiwary Love Letter Celebration: भारताचा क्रिकेटर मनोज तिवारी आता राजकारणात सक्रिय आहे. निवडणुकीत विजय मिळवून तो आता बंगालचा क्रीडा मंत्री म्हणून कार्यभार सांभाळतो आहे. असे असले तरी त्याचं पहिलं प्रेम क्रिकेट त्याने अद्यापही सोडलेलं नाही. त्याने नुकतंच क्रिकेट मैदानात दमदार शतक झळकावलं आणि त्यासोबतच त्याने मैदानावरून त्याची पत्नी सुश्मिता रॉय हिला रोमँटिक लव्ह लेटर पाठवलं.
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मनोज तिवारीने बंगालचे नेतृत्व करताना सलग दुसरे शतक झळकावले. या दमदार शतकानंतर त्याने जे केले त्याने सर्वांची मने जिंकली. शतक झळकावल्यानंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीवर त्याच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींची नावे लिहीली होती. सर्वप्रथम त्याने पत्नी सुष्मिताचे नाव लिहिले होते. मनोज तिवारीची ही कृती साऱ्यांचेच मन जिंकून गेली.
मनोज तिवारीच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे त्याच्या कुटुंबावर किती प्रेम आहे यातून दिसून आले.
मनोज तिवारीचे सलग दुसरे शतक
मध्य प्रदेशविरुद्ध दुसऱ्या दिवशी ८४ धावांवर नाबाद परतलेला मनोज तिवारी गुरूवारी १०२ धावा करून बाद झाला. यासह त्याने शाहबाज अहमद सोबत सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची विक्रमी भागीदारी केली. आरसीबी कडून खेळलेला अष्टपैलू शाहबाज यानेही शतक (११६) झळकावले. मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २९वे शतक ठोकले. ५ बाद ५४ च्या धावसंख्येवर असताना या दोघांनी बंगालला ३४१ धावांपर्यंत मजल मारून दिली. गेल्या आठवड्यातही मनोज तिवारीने उपांत्यपूर्व फेरीत १३६ धावांची खेळी केली होती.