नवी दिल्ली : मिस वर्ल्डचा किताब घेऊन भारतात परतलेल्या मानुषी छिल्लरचं देशभर कौतुक होतंय. तिने नुकतंच मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं. विश्वसुंदरी ठरलेल्या मानुषीला भेटण्यासाठी तिचे चाहतेही ती जाईल तिथं गर्दी करताहेत. तसंच इतर क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर व्यक्तीही तिची भेट घेत आहेत. भारतात आल्यानंतर सगळ्यांना भेटण्याचा तिने सपाटाच लावला आहे जणू. त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमातही तिला आवर्जुन बोलावलं जातंय. त्याचप्रमाणे ‘सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर २०१७’ या कार्यक्रमातही तिला बोलावलं गेलं. या कार्यक्रमात आल्यावर तिची भेट झाली विराट कोहलीशी.
सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो बरेच व्हायरल होताहेत. क्रिकेटविश्वातलं प्रसिद्ध व्यक्तीमत्तव आणि विश्वसुंदरी एकत्र आल्याचं पाहून सारेच नेटीझन्स खूश झाले होते. मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डच्या शेवटच्या फेरीत विचारलेल्या प्रश्नाचं अगदी चोख उत्तर दिल्याने जगभर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तिच्या समयसुचकतेवर सारेच स्तुती सुमनं उधळत आहेत. विराट कोहलीही स्मार्ट असल्याचं आपण पाहिलंय. त्याच्या ट्विटवरून त्याने अनेक सामाजिक विषयांवरही भाष्य केलंय. ‘सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर २०१७’ या कार्यक्रमातही त्याने मानुषीने विचारलेल्या एका प्रश्नावर असच सडेतोड उत्तर दिलं, ज्यामुळे तो आता पुन्हा सोशल मीडियावर सगळ्यांचा चाहता बनला आहे.
मानुषीनं विराटला विचारलं की, ‘तू आता जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज आहेस, अनेक तरुण तुझ्याकडून प्रेरणा घेत आहेत. याच युवा पिढीला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी काय सल्ला देशील?’ त्यावर विराट म्हणाला की, ‘आयुष्यात जे काही करायचं असेल तर ते मनापासून करावं. मग क्षेत्र कोणतंही असो, खेळ असला तरीही मैदानावर मनापासून आपली कामगिरी बजवावी. तुम्ही जर नुसतच दिखावा म्हणून खेळात असाल तर ते लगेच हेरलं जातं. दिखाव्यामुळे चाहत्यांशी नाते जोडले जाऊ शकत नाही. मी कधीही कोणाचीच नक्कल केली नाही, कोणासारखे होण्याचा प्रयत्न केला नाही. मी फक्त स्वत:लाच जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आलो. इथवर येण्यासाठी मीही अनेक समस्यांचा सामना केला आहे. माझ्यात बदल करणं गरजेचं आहे, असं मला जेव्हा समजलं तेव्हा मी माझ्यात बदल केला. त्यासाठी मी अजिबात मागे वळून पाहिलेलं नाही. पण तुम्ही तुमच्यात बदल घडवून आणत असाल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, आपल्यातला खरेपणा अजिबात सोडता कामा नये, आपला खरेपणा जपला तरच प्रेक्षकांशी अतुट नातं निर्माण होत जातं.’ त्याच्या या उत्तराने विराटने उपस्थितांचे मन तर जिंकलेच, पण त्याचं हे उत्तर जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं तेव्हा नेटीझन्सनेही त्याच्या या उत्तराचं कौतुक केलंय.
आणखी वाचा - भन्नाट! सलग तीन कसोटीत शतकांची हॅटट्रीक करणारा विराट पहिला कर्णधार