ढाका : क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) दिशानिर्देशांमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि कोरोना व्हायरसमुळे निलंबनानंतर क्रिकेट पुन्हा सुरू करण्यापूर्वी काही मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे बांगलादेशचा निलंबित अष्टपैलू शाकिब-अल-हसनने म्हटले आहे.
कोविड-१९ महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर सदस्य देश यात आता काही प्रमाणात सूट देत आहेत. आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी शुक्रवारी दिशानिर्देश जाहीर केले. त्याचसोबत उच्च पातळीवर सुरक्षा उपाययोजनाही केल्या जात आहेत.
कथित सट्टेबाजाने संपर्क साधल्याची माहिती न दिल्यामुळे वर्षभरासाठी निलंबनाच्या कारवाईला सामोरा जात असलेला शाकिब म्हणाला,‘कोविड-१९ चे संक्रमण केवळ तीन किंवा सहा नवे तर १२ फूट अंतरावरुनही होऊ शकते, असे ऐकायला मिळत आहे. याचा अर्थ षटक संपल्यानंतर फलंदाजांना एकमेकांच्या जवळ जाता येणार नाही.’ तो म्हणाला,‘मग त्यांना आपल्याच टोकाला उभे राहावे लागेल ? स्टेडियममध्ये कुणी प्रेक्षक राहणार नाही ? यष्टिरक्षक दूर उभा राहील ? जवळच्या क्षेत्ररक्षकांचे काय होईल ? या सर्व मुद्यांवर चर्चा होणेआवश्यक आहे.