Ruturaj Gaikwad, IND vs AUS 5th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना आज (3 डिसेंबर) होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. भारतीय संघाने मालिकेत आधीच ३-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकून भारताला विजयी लय कायम राखायची आहे. त्यातच आज संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला एक महत्त्वाचा विक्रम करण्याची संधी आहे.
ऋतुराज करणार का मोठा पराक्रम?
सामन्यात सर्वांच्या नजरा इतिहास रचण्यापासून 19 धावा दूर असलेल्या सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडवर असतील. ऋतुराजने 19 धावा करताच तो मोठा विक्रम करेल. तो कोणत्याही द्विपक्षीय टी२० मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. गायकवाडने सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एकूण चार सामने खेळले आहेत आणि 71 च्या सरासरीने 213 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक आहे.
कोणाचा विक्रम मोडणार?
भारतीय संघाकडून द्विपक्षीय टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. किंग कोहलीने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या होम टी२० मालिकेत 231 धावा केल्या होत्या. या बाबतीत केएल राहुल सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. राहुलने 2020 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत 224 धावा केल्या होत्या.
सामन्यात दोन बदलांची शक्यता
पाचव्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये काही बदल दिसू शकतात. या सामन्यात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते, जेणेकरून त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी थोडा सराव करता येईल. सुंदर गेल्या काही दिवसांपासून दुखापतींमुळे त्रस्त होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० संघात स्थान न मिळालेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी सुंदरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. यासोबतच अष्टपैलू शिवम दुबेलाही या सामन्यात संधी मिळू शकते.
पाचव्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, दीपक कुमार चहर, मुकेश कुमार