Marathi Cricketer Retirement: IPL ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. येथे खेळून क्रिकेटपटूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएलमध्ये खेळून अनेक क्रिकेटपटूंनी आपली कारकीर्द घडवली आहे. यंदाच्या हंगामात तर ८ ऐवजी १० संघ असल्याने अधिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण तशातच सध्याच्या घडीला एक खेळाडू असा आहे जो टीम इंडियातून बाहेर पडत आहे आणि या खेळाडूला मेगा लिलावातही कोणत्याही संघाने विकत घेतलेले नाही. त्यामुळे या परिस्थितीत हा मराठमोळा खेळाडू निवृत्ती घेऊ शकतो अशी जोरदार चर्चा आहे.
एकेकाळी टीम इंडियाच्या मधल्या फळीचा आधार मानला जाणारा तो खेळा़डू म्हणजे केदार जाधव. केदार २०१० पासून IPL खेळतोय. केदार जाधवची IPLमधील कामगिरी अत्यंत मध्यम स्वरूपाची होती. केदार २०१८ ते २०२० पर्यंत CSK कडून खेळला. त्यानंतर त्याला २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले, परंतु तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. IPL 2021 मध्ये केदार जाधवने ६ सामन्यांत केवळ ५५ धावा केल्या. तर एकूण ९३ IPL सामन्यांमध्ये त्याने १ हजार १९६ धावा केल्या आहेत.
एकेकाळी टीम इंडियाच्या फलंदाजीचा आधार असलेला केदार जाधव सध्या अतिशय खराब फॉर्मशी झगडत आहे. तो गेली दोन-तीन वर्षे भारतीय संघातून बाहेरच आहे. केदार जाधवला २०१९ विश्वचषकात संघात घेण्यात आलं होतां. पण त्यावेळीही तो फारशी चमक दाखवू शकला नाही. केदार जाधवने भारताकडून ७३ वनडे सामन्यांमध्ये १ हजार ३८९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ९ टी२० सामन्यांत १२२ धावा केल्या आहेत. त्याला कधीही टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळाले नाही. केदारला गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियात स्थान मिळू शकलं नसल्याने तो IPL सुरू असतानाच निवृत्तीची घोषणा करू शकतो असं बोललं जात आहे.