नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) मोठ्या कालावधीपासून इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये (The Hundred Leauge) खेळत आहे. याच लीगमधील ओव्हल इनव्हिन्सिबल्सविरुद्धच्या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने पाकिस्तानच्या गोलंदाजावर आक्षेप घेऊन नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. सध्या स्टॉयनिसवर विविध स्तरातून टीका होत आहे, मात्र त्याच्यावर कोणती कारवाई होणार का याची मोठी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, साउथर्न ब्रेव्हसाठी द हंड्रेड लीगमध्ये खेळत असलेल्या मार्कस स्टॉयनिसला पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद हसनैनने (Mohammad Hasnain) १४२ प्रति ताशी वेगाने चेंडू टाकून बाद केले. बाद झाल्यावर डगआउटमध्ये परतत असताना स्टॉयनिसने गोलंदाजाची ॲक्शन करून गोलंदाज फेकी गोलंदाजी करत आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.
स्टॉयनिसने केली नक्कल मात्र सामना संपल्यानंतर स्टॉयनिसने केलेल्या कृत्याची दखल घेण्यास सुरूवात झाली. मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर प्रश्न उपस्थित केले असले तरी स्टॉयनिसवर अधिकृतपणे कोणतीही कारवाई केली जाणार नाही. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बाद झाल्यावर डगआउटमध्ये परतत असताना स्टॉयनिसने पाकिस्तानच्या गोलंदाजाची नक्कल केली होती. त्यामुळेच सामन्यातील पंचांनी त्याला बोलावले होते.
गोलंदाजाची नक्कल केली म्हणून नियमांचे उल्लंघन झाले असे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्टॉयनिसवर कोणतीही कारवाई होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे बीग बॅश लीगमध्ये हसनैनला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले होते. मात्र जूनमध्ये त्याने नवीन ॲक्शनसह मैदानात पुनरागमन केले होते.