27 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 852 सामन्यांत जवळपास 40,826 धावा, 96 शतकं, 738 झेल आमइ 93 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडचा माजी सलामीवीराने गुरुवारी अखेर निवृत्ती जाहीर केली. 12 वा खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या या खेळाडूला सहकाऱ्यांनी गॉर्ड ऑफ ऑनर दिला. हा सलामीवीर मैदानावर उतरला त्यावेळी प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. इंग्लंडकडून सलामीला खेळताना या फलंदाजांने जगातील भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांना चांगलेच दमवले. भारताविरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली. भारताविरुद्धच्या अवघ्या चार कसोटी सामन्यांत त्यानं 59.16 च्या सरासरीनं 355 धावा केल्या. असा हा फलंदाज वयाच्या 43व्या वर्षी निवृत्त झाला.
3 ऑगस्ट 2000 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तत्पूर्वी जुलै महिन्यात त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध वन डे संघात पदार्पण केले. त्याने 2 कसोटी आणि 10 वन डे सामन्यांत इंग्लंड संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटीत त्यानं 76 सामन्यात 43.79च्या सरासरीनं 5825 धावा केल्या, तर वन डेत 123 सामन्यांत 4335 धावा केल्या आहेत. कसोटी ( 14) व वन डे ( 12) सामन्यांत त्याच्या नावावर 26 शतकं आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा फलंदाज कोण?
मार्कस ट्रेस्कॉटीक असे या दिग्गज फलंदाजाचे नाव आहे. त्यानं 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण, व्यावसायिक लीगमध्ये त्याचे खेळणे सुरू होते. गुरुवारी कौंटी स्पर्धेत त्याने अखेरचा सामना खेळला. सोमरसेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना ट्रेस्कॉटीकने मैदानावर 12वा खेळाडू म्हणून एन्ट्री घेतली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.