वन डे वर्ल्ड कप नुकताच पार पडला... ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला पराभूत करून सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला... हा वर्ल्ड कप संपल्यानंतर ४ दिवसातच आयसीसीने मोठा निर्णय घेतला आणि दोन वर्ल्ड कप नावावर असलेल्या खेळाडूवर ६ वर्षांची बंदीची कारवाई केली. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज मार्लन सॅम्युअल्सला ( Marlon Samuels ) अमिराती क्रिकेट बोर्ड (ECB) लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने सर्व क्रिकेटमधून सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
सॅम्युअल्सवर ICC ने ECB कोड अंतर्गत नियुक्त भ्रष्टाचार विरोधी अधिकारीने सप्टेंबर २०२१ मध्ये एकूण चार आरोप लावले होते आणि या वर्षी ऑगस्टमध्ये गुन्ह्यांसाठी तो दोषी आढळला. गुरुवारी आयसीसीने ६ वर्षांच्या बंदीची कारवाई केली आणि ती ११ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होईल.
- कलम २.४.२ - कोणत्याही भेटवस्तू, पेमेंट, आदरातिथ्य किंवा इतर लाभांची पावती नियुक्त केलेल्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्याला जाहीर करण्यात अयशस्वी ठरला. या प्रकारामुळे क्रिकेटची बदनामी झाली.
- कलम २.४.३ - ७५० अमेरिकन डॉलर किंवा त्याहून अधिक मूल्य असलेल्या आदरातिथ्याची अधिकृत पावती उघड करण्यात अयशस्वी.
- कलम २.४.६ - नियुक्त केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या तपासात सहकार्य करण्यात अयशस्वी
- कलम २.४.७ - तपासाशी संबंधित असलेली माहिती लपवून नियुक्त केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे.
आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख असलेले अॅलेक्स मार्शल यांनी गुरुवारी बंदीची घोषणा केली. मार्शल म्हणाले, “सॅम्युअल्सने जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, ज्या दरम्यान त्याने भ्रष्टाचारविरोधी अनेक सत्रांमध्ये भाग घेतला आणि भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत त्याची जबाबदारी नेमकी काय आहे हे त्याला माहीत होते. तो आता निवृत्त झाला असला तरी, जेव्हा गुन्हा घडला त्यात सॅमुअल्सचा सहभाग होता.
सॅम्युअल्सने १८ वर्षांच्या कालावधीत वेस्ट इंडिजसाठी ३००हून अधिक सामने खेळले. त्याने एकूण १७ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये कॅरेबियन संघाचे नेतृत्वही केले आहे. २०१२ आणि २०१६ च्या आयसीसी पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने सर्वाधिक धावा केल्या. वेस्ट इंडिजने हे वर्ल्ड कप जिंकले होते.