सिडनी : ‘ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नुस लाबुशेनचे पदलालित्य पाहून मला माझ्या खेळाची आठवण येते,’ असे मत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.
मेलबोर्न येथील बुशफायर मदतनिधी सामन्यासाठी प्रशिक्षक म्हणून आलेल्या सचिनला कोणता खेळाडू तुझ्यासारखा खेळतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सचिनने सांगितले, ‘मी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड दरमन्यानची लॉर्ड्वर झालेली दुसरी कसोटी पाहिली. लाबुशेन जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाला होता. मात्र त्यानंतरही त्याने ज्यापद्धतीने फलंदाजी केली तेव्हाच हा खेळाडू खास असल्याचे लक्षात आले.’
सचिन म्हणाला, ‘लाबुशेनमध्ये विशेष बाब आहे. त्याचे फुटवर्क एकदम योग्य आहे. फुटवर्क ही बाब शारिरिक नसून मानसिक आहे. जर तुम्ही सकारात्मक नसाल तर आपले पाय योग्य पद्धतीने पडत नाहीत. ’ २५ वर्षाच्या मार्नस लाबुशेन याने मागील वर्षी कमालीचे सातत्य राखताना कसोटीत ११०४ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ जखमी झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून लॅबुशेनचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर कसोटी संघातील जागा पक्की केली आहे. अॅशेस मालिकेत त्याने ५०.४२ च्या सरासरीने ३५३ धावा केल्या आहेत.
सचिनने लॅबुशेनची तुलना विराट कोहली व स्टिव्ह स्मिथ याच्याशी करण्यास नकार दिला. तो म्हणाला,‘ मी नेहमीच तुलना करण्याच्या विरोधात आहे. माझी तुलना अनेक खेळाडूंशी करण्यात आली होती. मात्र मला एकटे सोडा असे माझे म्हणणे होते. आपण या दोन्ही खेळाडूंच्या खेळाचा आनंद घ्यायला हवा. या दोघांची फलंदाजी पाहणे आनंददाई आहे. ’