ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमावरीतील इंग्लंडच्या जो रूटची मक्तेदारी संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन हा नवा टॉपर बनला आणि स्टीव्ह स्मिथही दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जो रूटला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात फार कमाल करता आली नाही, परंतु लाबुशेनने दुसरीकडे वेस्ट इंडिजचे बारा वाजवले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पर्थ कसोटीत रूटने २०४ व १०४* धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली, तर लाबुशेन ९३५ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यानेही विंडीजविरुद्ध शतक झळकावले होते आणि तो ८९३ रेटींग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने रावळपिंडी कसोटीत शतक झळकावले आणि तो ८७९ रेटींग गुणांसह तिसऱ्या स्थानी आला आहे. रूट ( ८७६) चौथ्या क्रमांकावर आहे, तर भारताचे रिषभ पंत ( ८०१) व रोहित शर्मा ( ७४६) हे अनुक्रमे पाचव्या व नवव्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्सने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर आर अश्विन व जसप्रीत बुमराह हे भारतीय गोलंदाज अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानी आहे, तर आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वन डे क्रमवारीत फलंदाजांमध्ये रोहित शर्मा व विराट कोहली अनुक्रमे नवव्या व दहाव्या क्रमांकावर आहेत, गोलंदाजांमध्ये एकही भारतीय टॉप टेनमध्ये नाही. पण, जसप्रीत बुमराह ( ६१७) १६व्या आणि मोहम्मद सिराज ( ५४९) २६व्या क्रमांकावर आहे. बुमराहनंतर सिराजचे सर्वाधिक रेटिंग गुण आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"