एडिनबर्ग : न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तिल याने टी-२० मध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. बुधवारी स्कॉटलँडविरुद्ध ३५ वर्षांच्या गुप्तिलने ३१ चेंडूंत ४० धावा ठोकून या प्रकारात सर्वाधिक धावांची नोंद करण्यात रोहित शर्मा याला मागे टाकले. गुप्तिलच्या या प्रकारात ३३९९ धावा झाल्या. रोहितच्या ३३७९ इतक्या धावा आहेत.
गुप्तिल आणि रोहित यांची तुलना केल्यास वेगवान धावा काढण्यात गुप्तिल पुढे आहे. त्याने ११६ सामन्यांत दोन शतके आणि २० अर्धशतकांसह ३३९९, तर रोहितने १२८ सामन्यांत चार शतके आणि २६ अर्धशतकांसह ३३७९ धावा केल्या आहेत. चौकार- षट्कारांबाबत सांगायचे तर गुप्तिलने २९७ चौकार आणि १६९ षट्कार, तर रोहितने ३०३ चौकार आणि १५७ षट्कार मारले. गुप्तिलला पुन्हा मागे टाकण्याची रोहितकडे संधी असेल. शुक्रवारपासून विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत असून रोहित पुढे निघून जाऊ शकतो. कोहली २०२१ मध्ये या प्रकारात ३००० हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनला होता.