नवी दिल्ली : संघाबरोबर परदेश दौऱ्यांसाठी आता क्रिकेटपटूंच्या पत्नी किंवा मैत्रिणींनाही क्रिकेट मंडळाच्या खर्चाने घेऊन जाता येते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या बायकाही होत्या. जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली तेव्हा मैदानात भारताचा कर्णधार विराट कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्माही आली होती. पण कोणत्याही बायकोने आपल्या क्रिकेटपटू असलेल्या नवऱ्याची सर्वांसमोर मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. पण ही गोष्ट घडली आहे आणि तीदेखल क्रिकेटच्या मैदानात.
भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. आता त्यांची एकदिवसीय मालिका बांगलादेशबरोबर सुरु आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्तीलने शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गप्तीललाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
सामनावीराचा पुरस्कार देताना गप्तीलची मुलाखत घेतली ती त्याची पत्नी लॉरा मैक्गोल्डरिक हिने. न्यूझीलंडची ही मालिका स्काय स्पोर्ट्सवर प्रसारित होत आहे आणि लॉरा ही या चॅनेलची प्रतिनिधी आहे. लॉराने मुलाखत घेतली आणि हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
क्रिकेटपटूंच्या बायका ठरतायत बीसीसीआयसाठी डोकेदुखी; 'हे' आहे कारणपरेदशातील दौऱ्यांमध्ये क्रिकेटपटूंबरोबर पत्नी किंवा मैत्रिणींना दोन आठवडे राहण्याची परवानगी बीसीसीआयने दिली होती. ही गोष्ट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दौऱ्यासाठी कायम ठेवण्यात आली होती. यावेळी भारतीय संघात ज्यांचे स्थान कायम नाही, त्यांनीही आपल्या पत्नी किंवा मैत्रिणींना संघाबरोबर ठेवले होते. त्यामुळे एकूण 40 व्यक्ती बीसीसीआयच्या खर्चाने फिरत होत्या. बीसीसीआयसाठी पैसा ही समस्या नाही. पण तरीही पत्नी किंवा मैत्रिणींनी बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, “ जेव्हा पत्नी किंवा मैत्रिणींनी खेळाडूंबरोबर असतात तेव्हा बऱ्याच गोष्टींची व्यवस्था पाहावी लागते. हॉटेलमधील रुमपासून ते त्यांचा प्रवास, त्यांना स्टेडियममध्ये प्रवेशिका उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठे बाहेर जायचे असेल तर त्याची व्यवस्थाही करावी लागले. त्यामुळे आगामी विश्वचषकात जर खेळाडूंबरोबर त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणी असतील तर बीसीसीआयसाठी ही फार मोठी डोकेदुखी असेल.“