Join us  

Asia Cup 2022:आशिया चषकात रोहित आणि विराटमध्येच 'सामना', विक्रमी आकड्यासाठी रस्सीखेच

टी-२० आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 1:09 PM

Open in App

नवी दिल्ली : टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ३,५०० धावा कोण करणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. या विक्रमी आकड्याला गवसणी घालण्यासाठी सध्या ३ खेळाडू शर्यतीत असून यामध्ये २ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. वेस्टइंडिजविरूद्धच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने (Martin Guptill) शानदार खेळी करून या विक्रमी आकड्याकडे कूच केली आहे. गुप्टीलच्या नावावर ३,४९७ धावांची नोंद असून तो केवळ ३ धावांनी या आकड्यापासून दूर आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे देखील त्याच्यापासून जास्त लांब नाहीत. 

विराट आणि रोहितमध्ये 'सामना'

दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सध्या मार्टिन गुप्टील अव्वल स्थानावर आहे. ३,४८७ धावांसह रोहित दुसऱ्या तर ३,३०८ धावांसह विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. २७ ऑगस्टपासून आशिया चषकाचे बिगुल वाजणार असून भारत आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध २८ ऑगस्ट रोजी खेळेल. रोहितला ३,५०० धावांच्या विक्रमी आकड्यापर्यंत पोहचण्यासाठी केवळ १३ धावांची गरज आहे. तर किंग कोहलीला १९२ धावा केल्यावर हा विक्रमी आकडा गाठता येईल.  विराट कोहली मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून या मालिकेसाठी रोहित आणि कोहली दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत देखील विराटला विश्रांती देण्यात आली होती. विराटने मागील जवळपास ३ वर्षांपासून एकही शतकी खेळी केली नाही. त्यामुळे आगामी आशिया चषकात त्याच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असेल. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान. 

 

टॅग्स :एशिया कपभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटन्यूझीलंडभारतपाकिस्तानरोहित शर्माविराट कोहली
Open in App