Join us  

स्वर्गातील क्रिकेटविश्वही समृद्ध झाले असेल!;मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झाला भावुक

स्वर्गातील क्रिकेटविश्वही समृद्ध झाले असेल, कारण तिथे आज आचरेकर सरांची उपस्थिती लाभली आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीदेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 3:57 AM

Open in App

मुंबई : स्वर्गातील क्रिकेटविश्वही समृद्ध झाले असेल, कारण तिथे आज आचरेकर सरांची उपस्थिती लाभली आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीदेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविले. माझ्या आयुष्यातील त्यांचे योगदान मी शब्दांत सांगू शकणार नाही. त्यांनी एक भक्कम पाया रचला आणि त्यावरच मी आज उभा आहे. गेल्याच महिन्यात मी सरांच्या काही विद्यार्थ्यांसह त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सरांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत केला होता. आचरेकर सरांनी आम्हाला कायम सरळ खेळण्याचे आणि सरळ वागण्याचे धडे दिले. त्यांच्या आयुष्यातील एक भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल आणि त्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी दिल्याबद्दल मी आचरेकर सरांचे आभार मानतो. खूप चांगले खेळलात तुम्ही सर आणि तुम्ही जिथे कुठे असाल, तेथे आणखी चांगले प्रशिक्षण तुम्ही द्याल, असे भावुक होऊन सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर आचरेकर सरांना श्रद्धांजली वाहिली.सन १९३२मध्ये मालवण येथे जन्मलेले आचरेकर यांनी १९४३पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर १९४५ मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधित्व केले. यासोबतच त्यांनी यंग महाराष्ट्र एकादश, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचेही प्रतिनिधित्व केले होते. आपल्या कारकिर्दीत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळताना आचरेकर यांनी १९६३-६४मध्ये आॅल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. मात्र, क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक वेगळीच उंची गाठली. शिवाजी पार्क येथे कामत स्मृती क्रिकेट क्लबची स्थापना करून आचरेकर यांनी एकाहून एक सरस क्रिकेटपटू घडविले. त्यांचा क्लब जणू उत्कृष्ट क्रिकेटपटू घडविणारा कारखानाच होता. सध्या आचरेकर यांचा हाच क्लब मुलगी कल्पना मुरकर आणि जावई दीपक मुरकर हे सांभाळत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यासह अनेक गुणवान क्रिकेटपटूंना घडवून आचरेकर यांनी क्रिकेट खेळामध्ये मोठे योगदान दिले.या सर्वच शिष्यांनी क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करीत आपल्या सरांना गुरुदक्षिणा दिली. आचरेकर यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळावर शोककळा पसरली आहे.क्रिकेटविश्वात सचिन-विनोद यांची जोडी जितकी प्रसिद्ध झाली, तशीच आचरेकर सर-सचिन ही गुरु-शिष्यांची जोडीही प्रसिद्ध झाली. यासोबतच सचिन-विनोद आणि आचरेकर सर यांचे अनेक किस्से आजही क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय आहे.रणजी पदार्पण केल्यापासून आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणासाठी सचिनने कायम आचरेकर यांचे आशीर्वाद घेऊनच वाटचाल केली आहे. शालेय क्रिकेट गाजवलेल्या सचिन-विनोद यांनी आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखालीच ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी करुन सर्वप्रथम सर्वांचे लक्ष वेधले होते. यानंतर जे काही घडले तो इतिहास...ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणाराएक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे. पद्मश्री आणि द्रोणाचार्यपुरस्काराने गौरवान्वित झालेल्या आचरेकर सरांचे क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान खेळाडूसोबत चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे आदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडविण्यात आचरेकर सरांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घडविलेल्या अनेक खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षक म्हणूनही कारकीर्द घडविली आहे. पुस्तकी तंत्रापेक्षा खेळाडूच्या नैसर्गिक गुणांना पैलू पाडण्याचे त्यांचे तंत्र विशेष होते.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीरमाकांत आचरेकरांपासून नेहमीच प्रभावित झालो. त्यांचे प्रशिक्षण अप्रतिम होते म्हणूनच सचिन, विनोद, चंद्रकांत, आमरेसारखे खेळाडू तयार झाले. त्यांना माझी आदराची श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.-चंदू बोर्डेरमकांत आचरेकर जुने आणि अनुभवी प्रशिक्षक होते. त्यांचे भारतातील खेळासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यासारखे खेळाडू घडवले त्या काळात कॉम्प्युटरसारखी अद्ययावत साधने नसतानादेखील खेळतील बारकावे शोधण्याचे त्यांचे कसब आणि खेळाडूतील प्रतिभा हेरण्याची असणारी दृष्टी अनन्यसाधारण अशी होती. हा सर्व क्रीडाप्रेमींसाठी खूप मोठा धक्का आहे.-मिलिंद गुंजाळज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वाचा मार्गदर्शक दीपस्तंभ हरपला आहे. वंडरबॉय म्हणून जागतिक क्रिकेटविश्वात आपला ठसा उमटविणारा महान क्रिकेटवीर खासदार सचिन तेंडुलकर यांचे गुरू म्हणून रमाकांत आचरेकर सर लोकविख्यात होते. त्यांनी सचिन तेंडुलकरप्रमाणेच विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित अशा क्रिकेटरत्नांना घडविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटक्षेत्रात भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांनी घडविले. त्यांनी क्रिकेट प्रशिक्षण या क्षेत्रात आपला कायमचा ठसा उमटविला असून त्यांचे काम हे पुढील पिढ्यांनाही क्रिकेट क्षेत्रात दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत राहील. -रामदास आठवले,केंद्रीय राज्यमंत्रीज्यांनी क्रिकेटविश्वाला सचिनच्या रूपात एक अनमोल हिरा दिला त्यांचं दु:खद निधन झालं. रमाकांत आचरेकर सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. -व्ही.व्ही.एस.लक्ष्मण,माजी क्रिकेटपटूभारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने आकार देणाºया सचिन तेंडुलकरला आचरेकर सरांनी घडवलं. सरांच्या या योगदानाला माझा सलाम.-मोहम्मद कैफ, माजी क्रिकेटपटूक्रिकेटविश्वातील एका महान प्रशिक्षकाचं आज निधन झालं आहे. सचिन तेंडुलकरसारख्या १०० हून अधिक प्रतिभावंत खेळाडूंना त्यांनी घडवलं आहे. सरांना माझ्याकडून श्रद्धांजली. -राहुल बोस, अभिनेतासरांनी अगदी लहान वयातच सचिनमधले क्रिकेटचे गुण ओळखले आणि त्याला प्रशिक्षण दिलं. या त्यांच्या प्रशिक्षणामुळे जगाला एका महान फलंदाजाची ओळख झाली. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.-अतुल कसबेकर, प्रख्यात छायाचित्रकार

टॅग्स :सचिन तेंडुलकर