जागतिक महिला दिनानिमित्त सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. सचिनने दोन फोटो शेअर करत या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोतील प्रसंग कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडले आहेत. यांची कहाणी हृदयाला स्पर्श करणारी आहे. ८ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सानिया मिर्झा, पीव्ही सिंधू, मेरी कोम, सायना नेहवाल, साक्षी मलिक यांसारख्या मोठ्या नावांसह भारतातील क्रीडा विश्वातही अनेक महिलांनी आपला ठसा उमटवला आहे.
सचिनने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, भारतात आणि जगात गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे महिला क्रीडा क्षेत्रात उदयास आल्या आहेत, हे पाहून खूप उत्साह वाढतो. २००८ मध्ये जेव्हा २६/११ चा हल्ला झाला तेव्हा भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला होता. हा विजय संपूर्ण भारतासाठी खूप भावनिक होता. मी ज्यांच्यासोबत हा विजय साजरा केला ती पहिली व्यक्ती एक महिला होती. मी त्या भावना महिला ग्राउंड स्टाफसोबत शेअर केल्या. तो क्षण आजही माझ्यासाठी खूप खास आहे. एवढ्या वर्षांनंतर २०२४ मध्ये जॅसिंथा कल्याण ही भारताची पहिली महिला पीच क्युरेटर बनली. पण मला आशा आहे की, आम्ही भविष्यात आणखी अशा बऱ्याच महिला पाहू. या जागतिक महिला दिनानिमित्त अडथळे तोडून प्रत्येक क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊया.
भारतीय क्रिकेटचा 'मास्टर' सचिन
क्रिकेटच्या मैदानावर शतकांचे शतक झळकावणारा सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि वन डेमध्ये ४९ शतके झळकावली. आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले.
Web Title: Master blaster Sachin Tendulkar has shared a special memory on International Women's Day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.