ramakant achrekar and sachin tendulkar | मुंबई : भारतीय क्रिकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक महान रत्न देणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'क्रिकेटचा देव', मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं २०१९ मध्ये निधन झालं. त्यांनी ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला पण तमाम भारतीयांच्या कायम आठवणीत राहिल असं सचिन नावाचं रत्न त्यांनी देशवासियांना दिलं, ज्यानं क्रिकेट विश्वासह अवघ्या जगावर राज्य केलं.
खरं तर आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. आचरेकर सरांच्या जयंतीनिमित्त सचिनने एक पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहेत.
सचिनने आचरेकर सरांसोबतचा एक फोटो शेअर करत म्हटले, "ज्या व्यक्तीने मला क्रिकेटर बनवले त्यांच्यासाठी... त्यांनी शिकवलेले धडे आयुष्यभर माझ्यासोबत राहिले. आचरेकर सर तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार."
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडविण्यात आचरेकर सरांचे मोठे योगदान आहे. जागतिक कीर्तीचे अनेक खेळाडू त्यांनी घडविले. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. दादर येथील शिवाजी पार्क हे खेळाडूंसाठी चंद्रभागाप्रमाणे आहे. या मैदानात आचरेकर सरांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले.