मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू दिग्गज, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरची फलंदाजी म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असायची. भारतीयांनी क्रिकेटवर भरभरून प्रेम केलं. क्रिकेटच्या मैदानात असामान्य कामगिरी करणारा सचिन भारतीय चाहत्यांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू ठरला. किंबहुना अनेकांनी सचिन, सचिन म्हणत आपल्या चिमुकल्यांना क्रिकेटचे धडेही दिले. शतकांचे शतक झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी जगभरातील चाहते आतुर असायचे. याच रत्नाला घडवणाऱ्या रमेश तेंडुलकर अर्थात सचिनच्या वडिलांचा आज जन्मदिवस... आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा देताना सचिनने एक भावनिक पोस्ट केली आहे.
बाबांसोबतचा फोटो शेअर करत सचिनने म्हटले, "माझे वडील काळजी घेणारे होते पण ते कधीही कठोर नव्हते. मला माझ्या आयुष्यात जे करायचे आहे ते निवडू दिले आणि माझी स्वप्नं पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांनी त्यांच्या सर्व मुलांचे संगोपन केले... नेहमी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि एवढं स्वातंत्र्य दिलं. वडील काय असतात याचा एक धडा म्हणजे माझे बाबा. त्यांची विचारसरणी त्यांच्या वेळेच्या पुढे होती आणि मी त्यांच्यावर इतके प्रेम का करतो याच्या लाखो कारणांपैकी हे एक मोठे कारण आहे. त्यांच्यामुळेच मी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा, मला रोज तुमची आठवण येते."
दरम्यान, सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठमोठे विक्रम नोंदवले आहेत. १०० आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर २०० कसोटीत १५९२१, ४६३ वन डेत १८४२६ धावा आहेत. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेला सचिन आता मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार म्हणून चर्चेत आहे. सोशल मीडियावर याची चर्चा असली तरी अद्याप मुंबईच्या फ्रँचायझीने अथवा सचिनने याबाबत काहीही भाष्य केलं नाही. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही मेंटॉरपद सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. सचिन तेंडुलकर २००८ मध्ये मुंबई इंडियन्स संघात एक खेळाडू म्हणून सहभागी झाला आणि तो २०१३ पर्यंत या संघासाठी खेळत राहिला. यानंतर मुंबई संघाने त्याच्याकडे मेंटॉरपदाची जबाबदारी सोपवली. सचिन ६ वर्षे मुंबईकडून आयपीएल खेळला आणि यादरम्यान त्याने ७८ सामन्यांमध्ये २३३४ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि १३ अर्धशतके झळकावली. सचिनने २९५ चौकार आणि २९ षटकार मारले. रोहितनंतर आता सचिन तेंडुलकरही मेंटॉरपदाची जबाबदारी सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पण, हे वृत्त खोटे आहे.
Web Title: Master blaster Sachin Tendulkar shared an emotional post on his father Ramesh Tendulkar's birthday
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.