मुंबई- सोशल मीडियावर दररोज एकना एक व्यक्ती टोलर्सच्या निशाण्यावर असते. आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर होता. सचिन तेंडुलकरने सोमवारी सकाळी टीम इंडियाच्या भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या मॅचवर केलेल्या ट्विटमुळे त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल व्हावं लागलं. सचिनने केलेल्या ट्विटमध्ये काही चूक नव्हती पण त्याच्या ट्विटची वेळ चुकली होती. सचिनच्या ट्विटमध्ये असलेला मुद्दा हा मॅचच्या हाफटाईमपर्यंतचा होता. पण ते ट्विट सकाळी पोस्ट झालं. या ट्विटमुळे नेटिझन्सकडून सचिन चांगलाच ट्रोल झाला.
'रोहित-विराटची शानदार बॅटिंग. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टाइट फाइट होणार आहे. आपण शेवट चांगला करू अशी अपेक्षा', असं ट्विट सचिनने केलं. सोमवारी सकाळी 6.48 वाजता सचिनने हे ट्विट केलं. टीम इंडियाने रविवारी रात्री 6 विकेट्सने मॅच जिंकली होती. याच कारणामुळे सचिनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. रविवारी झालेल्या धमाकेदार मॅचमध्ये विराट कोहलीने 113 रन्स केले तर, रोहित शर्माने 147 रन्स केले. मॅचमध्ये रन्सचा डोंगर रचून भारताने न्यूझीलंडसमोर 337 रन्सचं आव्हान उभं केलं. या रन्सचा पाठलाग करत न्यूझीलंडने 331 रन्स केले.
मॅच जिंकल्यानंतर सचिनने केलं अभिनंदनरविवारच्या सामन्यात भारताने केलेल्या कामगिरीचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आधीच ट्विट करून कौतुक केलं होतं. पण त्यानंतर आज सकाळी केलेल्या ट्विटमुळे त्याला जास्त ट्रोल करण्यात आलं. सचिनने रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी ट्विट केलं होतं. या ट्विटमधून सचिनने टीमचं टी-20 मालिकेतील विजसाठी कौतुक केलं होतं.
नेमकं काय घडलं असेल ? रात्री ट्विट करून अभिनंदन केल्यानंतर पुन्हा सचिनने ट्विट का केलं? यावर विविध तर्कवितर्क काढले जातं आहेत. यामागे दोन गोष्टी असू शकतात. आज सकाळी सचिनच्या अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या ट्विटची वेळ चुकीची दाखविली जाते आहे. किंवा सचिनने हाफटाईमनंतर ट्विट केलं असेल आणि काही कारणाने ते त्यावेळी पोस्ट झालं नसावं, अशा दोन शक्यता वर्तविल्या जात आहेत. पण तरिही सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टरला ट्रोल केलं जातं आहे. पण हे ट्विट नेमकं कसं पोस्ट झालं याबद्दलचा अंदाज बांधणं सध्यातरी कठीण आहे.