किंगस्टन - टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पराभूत करत दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. कसोटीच्या दुसऱ्या सामन्यात हनुमा विहारीने शानदार शतक झळकावत भारताच्या विजयावर मोलाची कामगिरी बजावली. तर, अजिंक्य रहाणेलाही पुन्हा सूर गवसला आहे. हनुमा विहारीच्या खेळीचे कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. तसेच, वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत भारताला हनुमा मिळाला, असे विराटने म्हटले.
कर्णधार विराटनंतर, भारताच्या विजयानंतर काही वेळातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करुन हनमा विहारी आणि अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं आहे. हनमाची फलंदाजी लव्हली होती, तर अजिंक्यचा संयम आणि अनुभवी खेळ हा लक्षणीय ठरल्याचे सचिनने म्हटले. तसेच जसप्रीत बुमराहची हॅटट्रीक अतिशय खास असून कसोटी सामन्यात त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी महत्त्वाची ठरणारी आहे, असे सचिनने म्हटले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे भारताने 257 धावांनी जमैका कसोटीवर विजय मिळवला. त्यामुळे, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने विजय मिळवत वेस्ट इंडिजच्या मैदानावर त्यांनाच धूळ चारत सिरीज जिंकली. जमैकाच्या सबीना पार्क मैदानावर चौथ्या दिवशीच्या खेळावेळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज डरेन ब्राव्हो मैदानातून परतला होता. जमैकाच्या पर्यावरणातील बदल आणि तापमानामुळे ब्राव्होला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे मैदानामध्ये फिजिओ आले आणि त्याला बाहेर घेऊन गेले होते.
हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार देण्यात आले होते.
भारताने 117 धावांत डाव गुंडाळूनही वेस्ट इंडिजला यजमानांवर फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला नाही. भारताच्या 467 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचे 45 धावांवर 2 गडी बाद झाले होते. चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने खेळाला सुरुवात केली. मात्र, चौथ्या दिवशीही सामन्यावर भारतीय फलंदाजांचे वचर्स्व राहिले. भारताने 210 धावांतच वेस्ट इंडिजच्या सर्वच खेळाडू्ंना बाद केले. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. दुसऱ्या डावाता मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. दोघांनीही प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर, इशांत शर्माने 2 गडी तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराहने केवळ 1 गडी बाद केला. दरम्यान, पहिल्या डावात बुमराहने 6 गडी बाद केले होते.