महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न 2011मध्ये पूर्ण झाले. महेंद्रसिंग धोनीनं मारलेला विजयी षटकार आणि त्यानंतर तेंडुलकरला खांद्यावर बसवून टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमला घातलेली प्रदक्षिणा, हे सारं आजही आपल्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं. श्रीलंकेविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला वरच्या क्रमांकावर आला होता. धोनीचं फलंदाजीला पुढे येण्यानं सामन्याला कलाटणी मिळाली. धोनीनं या सामन्यात 79 चेंडूंत नाबाद 91 धावांची खेळी केली होती आणि विजयी षटकार खेचून टीम इंडियाला 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकून दिला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद 103 धावांच्या दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी 6 बाद 274 धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग भोपळाही न फोडता माघारी परतला, तर सचिन तेंडुलकर केवळ 18 धावांवर परतला. यामुळे भारताचा डाव 2 बाद 31 धावा असा अडचणीत आला होता. मात्र विराट कोहली (35) आणि गौतम गंभीर (97) या दिल्लीकरांनी भारताचा डाव केवळ सावरलाच नाही, तर या विश्वविजयाचा पायाही रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला.
धोनीचं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा होता. तेंडुलकरनं स्वतः हे सांगितलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तेंडुलकरनं हा खुलासा केला. तेंडुलकरनं सांगितलं की,''गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची जोडी चांगली जमली होती. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्यासाठी योग्य पाऊन उचलणं गरजेचं होतं. मी वीरूला सांगितले की.. जर गौतम बाद झाला, तर युवराज सिंगनं फलंदाजीला जावं आणि विराट बाद झाला, तर धोनीनं जावं. युवी चांगल्या फॉर्मात होता, परंतु लंकेकडे दोन ऑफ स्पिनर होते. त्यामुळे रणनीती बदलल्याचा फायदा होईल, असं मला वाटलं.''
अन्य महत्त्वाचा बातम्या
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!
आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान
हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन
Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट
पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ
गौतम गंभीरची दिल्ली सरकारला आणखी 50 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांवर टीका