लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचार विरोधी समितीचे (एसीयू) प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे खेळ ठप्प झाल्यामुळे क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक वेळ घालवीत आहेत. भ्रष्टाचारी याचा उपयोग खेळाडूंसोबत जवळीक निर्माण करण्यासाठी करीत आहेत.
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन आहे. यापूर्वी स्पर्धात्मक लढत १५ मार्च रोजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळल्या गेली होती. कोविड-१९ मुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
‘द गार्डियन’ने मार्शलच्या हवाल्याने म्हटले की, ‘आमच्या निदर्शनास आले आहे की, खेळाडू सोशल मीडियावर नेहमीच्या तुलनेत अधिक वेळ घालवत असल्यामुळे भ्रष्टाचारी खेळाडूसोबत जुळण्यासाठी व जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर त्याचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.’
मार्शल म्हणाले की, क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्याचा अर्थ असा नाही की फिक्सिंगसाठी संपर्क साधण्याच्या घटनांमध्ये घट होईल. कोविड-१९ मुळे जगभरात आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेट स्पर्धा स्थगित असल्या तरी भ्रष्टाचारी अद्याप सक्रिय आहेत.(वृत्तसंस्था)
खेळाडूंना मोहित करणारे प्रस्ताव
कोरोना व्हायरस महामारीमुळे मैदानावर क्रिकेट पूर्णपणे ठप्प आहे आणि परिस्थिती केव्हा सामान्य होईल, हे सांगता येणे कठीण आहे. मार्शल म्हणाले, ‘या अडचणीची कल्पना देण्यासाठी आम्ही आमचे सदस्य व खेळाडूंसोबत संपर्क साधला आणि भ्रष्ट व्यक्तींच्या संपर्काची माहिती दिली.’ सामने नसल्यामुळे पैसा मिळणार नाही. त्यामुळे कमी मिळकत असलेले क्रिकेटपटू फिक्सरच्या मोहित करणाऱ्या प्रस्तावांमुळे प्रभावित होऊ शकतात, याची एसीयू प्रमुखांच्या टीमला कल्पना आहे.
Web Title: match fixers using coronavirus lockdown period to build relationships with players reveals Alex Marshall
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.