चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावून आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केले. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बंदीचा काळ संपवून पुन्हा आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळण्याचा क्षण भावनिक होता. पण, या दोन वर्षांच्या काळात संशयाच्या वातावरणातून धोनीला जावे लागले आणि त्यामुळेच खूनापेक्षा मॅच फिक्सिंग हा सर्वात मोठा गुन्हा असल्याचे धोनी सांगतो.तो म्हणाला,''सर्वात मोठा गुन्हा कोणता असं मला विचाराल तर मी खून असं सांगणार नाही, तर मॅच फिक्सिंग असे सांगेन. स्पॉट फिक्सिंगमध्ये आमच्या संघाचा समावेश होता आणि त्यात माझं नावही सातत्यानं येत होतं. तो आम्हा सर्वांची कसोटी पाहणारा काळ होता. आम्हाला झालेली शिक्षा कठोर होती, असे चाहत्यांना वाटले आणि त्यानंतर पुनरागमनाचा दिवस खूपच भावनिक होता.'' एका डॉक्युमेंटरीत धोनीनं हे मत व्यक्त करून खेळावरील निष्ठा सिद्ध केली. या डॉक्युमेंडरीच्या ट्रेलरमध्ये धोनीसह सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि शेन वॉटसनही दिसत आहेत. दोन वर्षांच्या बंदीनंतर 2018 मध्ये मैदानावर उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने जेतेपदाचा तिसरा चषक उंचावला. गत हंगामात धोनीनं 75.83च्या सरासरीनं 455 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तिसरं स्थान पटकावलं. 23 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 12 व्या हंगामात सलामीच्या सामन्यात चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यास मुकाबला होणार आहे. आयपीएलनंतर धोनी वर्ल्ड कप स्पर्धेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज होणार आहे. ही त्याची चौथी आणि कदाचित शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा असणार आहे. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली त्यानं पहिला वर्ल्ड कप खेळला होता आणि 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप उंचावला होता. 2015 मध्ये भारताला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
धोनीनं 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि जानेवारी 2017 मध्ये त्यानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्वाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर सोपवली.