Join us  

खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन

Match Fixing in T20 World Cup 2024: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळत असलेल्या एका खेळाडूला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 5:37 PM

Open in App

Match Fixing in T20 World Cup 2024: टी२० क्रिकेटच्या इतिहासात सुरुवातीच्या काळात मॅच फिक्सिंगची अनेक प्रकरणे समोर आली होती. मात्र गेल्या काही वर्षांत आयसीसीने आक्रमकरित्या कारवाई करायला सुरुवात केल्यापासून प्रकरण शांत झाले होते. तसे असले तरी आता वर्ल्ड कपच्या या हंगामात मॅच फिक्सिंगने पुन्हा डोकं वर काढलं असल्याची चर्चा आहे. एका तक्रारीनंतर ICCच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने (ACU) संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याचे बोलले जात आहे.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, केनियाच्या माजी क्रिकेटपटूने युगांडाच्या एका खेळाडूला वेगवेगळ्या फोन नंबरवरून कॉल करून मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती. T20 विश्वचषक 2024 मधील ग्रुप स्टेजच्या सामन्यात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ही घटना गयानामध्ये घडली. केनियाच्या एका माजी वेगवान गोलंदाजाने युगांडाच्या एका खेळाडूला वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क साधत फिक्सिंगची ऑफर देण्याचे प्रयत्न केले. मात्र, युगांडाच्या खेळाडूने या फंदात न पडता आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलचे पालन करून याबाबतची माहिती दिली. खेळाडूने तात्काळ माहिती पुरवत ACU अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण थोडक्यात मिटवणे शक्य झाले.

एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, फिक्सिंगसाठी त्या व्यक्तीने युगांडाच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूला ऑफर देणे यात आश्चर्यकारक असे काहीच नाही. मोठ्या संघांपेक्षा लहान देशातील खेळाडू हे तुलनेने सोपे लक्ष्य असतात असे फिक्सर मानतात. परंतु या प्रकरणात खेळाडूने ताबडतोब आयसीसीला माहिती देऊन चांगले काम केले. या ऑफरबाबत युगांडाच्या खेळाडूने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी टीमला वेळेवर सांगितले नसते तर त्यालाही यात गुन्हेगार मानले गेले असते. छोट्या देशांतील बहुतांश क्रिकेटपटूंशी या प्रकरणी सतत संपर्क साधला जातो आणि T20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा गोष्टींना जोर येतो, असेही त्याने सांगितले.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024मॅच फिक्सिंगटी-20 क्रिकेटक्रिकेट सट्टेबाजी