क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असून, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायके मॅच फिक्सिंगच्या प्रकरणामध्ये अडकला आहे. जानेवारी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणारा सचित्रा सेनानायके गोलंदाजीच्या शैलीवरून झालेल्या वादानंतर आता मॅचफिक्सिंगच्या आरोपामध्ये अडकला आहे. श्रीलंकेच्या स्थानिक कोर्टाने मॅच फिक्सिंग प्रकरणात आता सचित्रा सेनानायकेविरोधात एक मोठा निर्णय दिला आहे.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू असलेल्या सचित्रा सेनानायके याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्याने एका स्थानिक कोर्टाने त्याच्यावर परदेशात जाण्यास बंदी घातली आहे. २०२० मध्ये झालेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सेनानायकेवर करण्यात आला आहे. त्याने कथितपणे दोन खेळाडूंना फोन करून मॅच फिक्स करण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप झाला होता.
कोलंबोच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाने सचित्रा सेनानायकेच्या प्रवासावर निर्बंध आणण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश तीन महिन्यांसाठी लागू राहिल. अॅटर्नी जनरल यांच्या विभागाला कोर्टाने हे आदेश दिले आहेत. अॅटर्नी जनरल यांना क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास विभागाकडून सेनानायकेविरोधात फौजदारी आरोप निश्चित करण्याचे आदेश मिळाले आहेत, अशी माहिती कोर्टाला देण्यात आली.
३८ वर्षीय सचित्रा सेनानायके याने २०१२ ते २०१६ या दरम्यान, श्रीलंकेकडून एक कसोटी, ४९ वनडे आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापूर्वी सेनानायकेवर २०१४ मध्ये वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळे निर्बंध घातले होते. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, गोलंदाजी करताना त्याचा हात काही वेळा १५ अंशापेक्षा अधिक वळला होता.