नवी दिल्ली : यंदाचे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. मंगळवारी आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. वेळापत्रक जाहीर होताच भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने स्पर्धेचे चार सेमीफायनलिस्ट जाहीर केले आहेत.
दरम्यान, विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी मुंबई आणि कोलकाता या शहरांची निवड केली गेली आहे, तर फायनल अहमदाबाद येथे होईल. वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. यंदा भारतीय संघ मायदेशात आयसीसीचा किताब जिंकून भारतीयांना खुशखबर देईल अशी आशा बाळगूया.
सेहवागच्या म्हणण्यानुसार, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ आगामी वन डे विश्वचषकात उपांत्य फेरी गाठतील. तो आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाबद्दल बोलत होता. एकूणच भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू