रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एका मोठ्या व्यासपीठावर खेळायचे आहे. तब्बल १२ वर्षानंतर भारतात वन डे विश्वचषक होत असून याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आज आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आगामी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले.
दरम्यान,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता. त्यामुळे आगामी स्पर्धेत विश्वचषकाचा किताब उंचावून टीम इंडिया तमाम भारतीयांना खुशखबर देणार का हे पाहण्याजोगे असेल.
कर्णधार रोहित विश्वचषकासाठी सज्ज रोहितने म्हटले, "आपल्या देशात विश्वचषक खेळण्याचा अनुभव खूप छान असणार आहे. १२ वर्षांपूर्वी भारत इथे जिंकला होता आणि मला खात्री आहे की, देशभरातील चाहते मैदानात येऊन सामना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. हा विश्वचषक खूपच स्पर्धात्मक असणार आहे कारण आता क्रिकेट वेगवान झाले आहे. तसेच सर्वच संघ पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक खेळ करत आहेत. हे सर्व जगभरातील चाहत्यांसाठी चांगलेच आहे, ते अनेक रोमांचक क्षण अनुभवत आहेत. आम्ही या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चांगली तयारी करण्यास आणि आमच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक आहोत."
विश्वचषकातील भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत १५ ऑक्टोबरला भारतीय संघ भिडेल.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
ICC 2023 World Cup knockouts schedule -
- उपांत्य फेरी १ - मुंबई - १५ नोव्हेंबर.
- उपांत्य फेरी २ - कोलकाता - १६ नोव्हेंबर.
- अंतिम सामना - अहमदाबाद - १९ नोव्हेंबर.