नवी दिल्ली : बरेचदा एखादा मातब्बर अभिनेता चित्रपटातील विशिष्ट व्यक्तिरेखेमध्ये चपखल बसत नसल्याने त्याला दुर्दैवाने वगळावे लागते. तशीच काहीशी गत सध्या भारतीय संघातील मोहम्मद शमीची झाली आहे. वनडे विश्वचषकात शमीला अद्याप संधी देण्यात आलेली नाही. दोनच वेगवान गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाकडून झालेला असल्याने शमीच्या आधी मोहम्मद सिराजला प्राधान्य मिळते आहे.
मोहम्मद शमीची संघातील भूमिका स्पष्ट आहे. पण सध्या भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना जास्त वाव असल्याने संघातील त्याचे स्थान डळमळीत झालेले आहे. २०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघातील खेळाडूंमध्ये त्यांच्या संघातील भूमिकेविषयी संभ्रम होता. मात्र यंदा ती चूक सुधारत भारतीय संघव्यवस्थापनाने प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी आखून दिलेली आहे. त्यामुळेच जागतिक स्तराचा गोलंदाज असूनही दुर्दैवीपणे शमीला पहिल्या तीन सामन्यांमध्ये बाहेर बसावे लागले. महत्त्वाचे म्हणजे विश्वचषक सुरू होण्याआधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शमीने ५ बळी घेतले होते.
दुसरीकडे, बुमराह आणि सिराज वेगवान गोलंदाजी विभाग समर्थपणे सांभाळत आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्याची वेगवान गोलंदाजीही त्यांना हातभार लावण्यात मदत करते आहे. तसेच एका फिरकी गोलंदाजाला विश्रांती दिली तर शार्दूल ठाकूर चौथ्या गोलंदाजाची भूमिका निभावतो आहे.
यंदा संगीत खुर्चीचा खेळ नाहीइंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ च्या विश्वचषकात भारतीय फलंदाज त्यांच्या क्रमावरून संभ्रमावस्थेत बघायला मिळाले. विशेषत: चौथ्या क्रमांकासाठी तर संगीत खुर्चीचा खेळ सुरू होता. वर्षभर चौथ्या क्रमांकावर खेळत आलेल्या अंबाती रायुडूला ऐन विश्वचषकाच्या तोंडावर संघातून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळविण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र तो प्रयोग सपशेल अपयशी ठरून तोंड पोळल्यामुळे यावेळी संघव्यवस्थापनाने ताकही फुंकून पिण्याचे ठरविलेले दिसते.
काही प्रश्न अनुत्तरितवनडे विश्वचषकात भारतीय संघ सध्या विजयी रथावर स्वार झालेला आहे. असे असले तरी काही प्रश्न अद्यापही उपस्थित केले जाऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजांची भूमिका नीट वठवू शकेल का? दुसरं शार्दूलची अवसानघातकी फलंदाजी बघता त्याच्या जागी शमीला खेळविण्यात काय अडचण आहे? कारण भारतीय फलंदाजांचा भन्नाट फॉर्म बघता आतापर्यंत आठव्या क्रमांकाच्या फलंदाजावर फलंदाजी करण्याची जबाबदारी आलेली नाही.
सिराजला विश्राम, मगच शमीला संधी - प्रसादभारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी शमीच्या संघातील स्थानाबाबत विचारले असता ते म्हणाले, भारतीय संघ सध्या गरजेनुसार खेळाडूंचा वापर करतो आहे. त्यामुळे पुढील सामन्यात जेव्हा कधी शमीची गरज पडेल तेव्हा नक्कीच त्याला संघात स्थान दिले जाईल. तसेच कोणता खेळाडू कोणाची जागा घेईल, हे सध्या स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिराजला विश्रांती देण्याची वेळ आली तरच शमीचा विचार होऊ शकतो.