IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गतविजेता चेन्नई सुपर किंग्स पहिल्याच सामन्यात उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे. पण, या सामन्याच्या पूर्वसंध्येला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मथीशा पाथिराना ( Matheesha Pathirana ) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४ च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. २१ वर्षीय श्रीलंकेच्या ज्यु. मलिंगाला महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध सिलहेत येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दुखापत झाली होती, जेव्हा तो त्याचा स्पेल पूर्ण करू शकला नव्हता.
पाथिराना बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातदेखील खेळू शकला नव्हता आणि तेव्हापासून तो श्रीलंका क्रिकेट (SLC) फिजिओसोबत पुनर्वसन करत आहे. ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार त्याला SLC कडून मंजुरी मिळाल्यावर तो CSK च्या संघात सामील होईल. तेच शिवम दुबे NCA तून बरा होऊन चेन्नईच्या ताफ्यात परतला आहे. पाथिरानाची दुखापत हा CSKसाठी मोठा धक्का आहे. त्यांना आधीच न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे तो मे महिन्यापर्यंत मैदानावर परतणार नाही.
पाथिरानाच्या अनुपस्थितीमुळे बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. मुस्तफिझूरला क्रॅम्पचा त्रास झाला होता आणि १८ मार्च रोजी चट्टोग्राम येथे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होते. पण, त्यानंतर तो चेन्नईमध्ये दाखल झाला आणि RCB विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी तो उपलब्ध आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असल्यास CSK कडे रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, महेश थीक्षाना यांच्यासह मोईन अलीचा पर्याय आहे.
दरम्यान, दुखापतीमुळे रणजी करंडक स्पर्धेला मुकलेला शिवम दुबे याने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर CSKच्या ताफ्यात दाखल झाला.