कोलंबो: वरिष्ठ फलंदाज आणि माजी कर्णधार ॲंजेलो मॅथ्यूज याने कराराच्या मुद्दावरुन श्रीलंका क्रिकेट बोर्डसोबत बिनसल्यामुळे राष्ट्रीय कर्तव्यातून माघार घेतली आहे. भारताविरुद्ध १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत तो खेळणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दुसरीकडे करारातील ३० पैकी २९ खेळाडूंनी स्वाक्षरी केल्याची माहिती एसएलसीने दिली. ३४ वर्षांचा मॅथ्यूज इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रीय संघात नव्हता. तो येत्या काही दिवसात निवृत्ती जाहीर करेल,असा अंदाज व्यक्त होत आहे.त्याने एप्रिलमध्ये बांगला देशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. ‘ भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ३० पैकी २९ खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी केली असून निवडण्यात आल्यानंतरही मॅथ्यूजने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याची परवानगी मागितल्याबची माहिती एसएलसीने दिली. सध्याच्या करारातून मॅथ्यूजसह कसोटी कर्णधार दिमूथ करुणारत्ने याला बाहेर ठेवण्यात आले आहे.श्रीलंका क्रिकेट प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात मॅथ्यूजने निवृत्तीची ही माहिती दिली असून पुढील काही दिवसात तो निवृत्तीची घोषणा करू शकतो. श्रीलंका क्रिकेटने प्रत्येक दौऱ्यातील कामगिरीच्या आधारे करार देण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी खेळाडूंना आठ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. याआधी करारावर स्वाक्षरीस नकार देणाऱ्या खेळाडूंनी आता स्वाक्षरी केली. कामगिरीच्या आधारे २४ खेळाडूंची चार गटात विभागणी करण्यात आली असून त्यातील सहा खेळाडूंना अ श्रेणीत स्थान देण्यात आले. त्यांचे वार्षिक वेतन ७० हजार ते एक लाख डॉलर इतके असेल. श्रीलंकेचा संघ राष्ट्रीय करारावर स्वाक्षरी न करताच इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला होता.
यशस्वी कर्णधार -९० कसोटी, २१८ वन डे आणि ७८ टी-२० सामने खेळण्याचा अनुभव असलेला मॅथ्यूज २०१२ ला लंकेचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात तीनही प्रकारात १५६ सामने खेळले. त्यात ६८ सामन्यात विजय मिळाला तर ७५ सामने गमावले. एक सामना टाय झाला, सहा सामने अनिर्णीत राहिले तर सहा सामन्यांचा निकाल लागू शकला नव्हता. श्रीलंकेचा तो चौथा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे.