भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हा कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे सांगून होम क्वारंटाईन होत असल्याचे सचिननं सांगितले होते. पण, शुक्रवारी त्यानं एक ट्विट करून वैद्यकिय सल्ल्यानुसार आता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत असल्याची माहिती दिली. सचिननं ट्विट केलं की,''तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेचे आभार. वैद्यकिय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. काही दिवसांतच घरी पुन्हा येईल, अशी आशा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. वर्ल्ड कप विजयाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्व भारतीय व संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा. '' ( Sachin Tendulkar Hospitalised a Week After Testing Positive for Covid-19)
कुटुंबातील अन्य सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
"मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या" असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. तसेच सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
सचिन तेंडुलकरनं नुकतंच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजंड्स संघानं जेतेपद पटकावलं. त्यानंतर तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या सीरिजमध्ये सहभागी झालेल्या एस बद्रिनाथ, इरफान पठाण व युसूफ पठाण यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढलली आहे.