T20 World Cup, Matthew Wade : मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन संघासाठी नायक ठरला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहिन आफ्रिदी याला कुटून काढले. वेडनं १७ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ४१ धावा करताना ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदाच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलं, ते मॅथ्यूच्या 'वेड' लावणाऱ्या खेळीच्या जोरावर. वेडचं आता सारेच कौतुक करत आहेत, परंतु त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहित्येय...
वयाच्या १६व्या वर्षी वेडनं कॅन्सरवर मात केली आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याला ऑस्ट्रेलियान संघातून वगळले गेले तेव्हा त्यानं सुतार काम केलं. त्याच्या या दिवसाबद्दल त्याचा माजी बॉस बेन लँगफोर्ड यांनी सांगितले की, तो क्रिकेटशिवाय दुसरा विचार करायला लागला होता. कारकीर्दित सर्वकाही सुरळीत चालू नव्हते आणि ही परिस्थिती कशी हाताळायची, हेही त्याला समजत नव्हते. पण, तो हार मानणाऱ्यांपैकी नक्कीच नव्हता. जेव्हा लोकं त्याची टिंगल उडवायचे, त्यांना तो कृतीतून उत्तर द्यायचा.''
२०१७च्या बांगलादेश दौऱ्यानंतर वेडला संघातून वगळण्यात आले. स्थानिक क्रिकेटमध्ये धावा करूनही निवड समिती त्याची परीक्षा घेत राहिली. मग विचार करा तो किती कणखर असेल, असेही ते म्हणाले.
१९व्या षटकाचा थरार
शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् पाकिस्तानवर दडपण निर्माण झालं. चेंडूवर वेडनं मारलेला स्कूप षटकार अप्रतिम होता. पाचव्या चेंडूवर वेडनं आणखी एक षटकार खेचून ७ चेंडू ६ धावा असा सामना जवळ आणला. वेडनं सलग तिसरा षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.