भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना एकतर्फी झालेला पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर यजमान न्यूझीलंडला 132 धावा करता आल्या. त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. पण, त्याचवेळी दुसरीकडे ऑस्ट्रेलियन फलंदाजानं ट्वेंटी-20त तुफान फटकेबाजी केली. त्यानं 213.11 च्या स्ट्राईक रेटनं धावा कुटल्या आणि संघाला 20 षटकांत 1 बाद 217 धावांचा डोंगर उभा करून दिला.
बिग बॅश लीगमधील या सामन्यात हॉबर्ट हरिकेन्स संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या मॅथ्यू वेडनं आजचा दिवस गाजवला. त्यानं अॅडलेट स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वेड आणि डी'आर्सी शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 203 धावांची विक्रमी भागीदारी केली. 19व्या षटकात शॉर्ट माघारी परतला. त्यानं 55 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार मारताना 72 धावा चोपल्या. वेडनं 61 चेंडूंत 11 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 130 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर हरिकेन्स संघानं 218 धावांचे लक्ष्य ठेवले. स्ट्रायकर्सचा वेस अॅगर ( 49 धावा), रशीद खान ( 35) आणि पीटर सिडल ( 38) महागडे गोलंदाज ठरले.