मुलींसाठी आता करिअरची नवी ‘पीच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 09:01 PM2017-07-28T21:01:57+5:302017-07-28T21:02:04+5:30

whatsapp join usJoin us
maulainsaathai-ataa-karaiaracai-navai-paica | मुलींसाठी आता करिअरची नवी ‘पीच’!

मुलींसाठी आता करिअरची नवी ‘पीच’!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शिखा पांडेचा ‘लोकमत’शी खास संवाद 
सचिन कोरडे 
महिला विश्वचषकाच्या फायनलकडे तमाम भारतीयांच्या नजरा लागल्या होत्या. पुरुषांच्या क्रिकेट सामन्यासारखीच या सामन्यांचीही चर्चा गल्लोगल्ली झाली. एवढी लोकप्रियता पहिल्यांदाच महिला खेळाडूंना मिळाली. त्याला कारणही तसेच होते. सर्वांच्या भुवया उंचावणारी कामगिरी भारतीय रणरागिणींनी केली. आता महिला क्रिकेटलाही ‘ग्लॅमर’ चढलंय. क्रिकेटपासून दोन हात दूर राहणाºया महिलांना करिअरसाठी आता नवा पर्याय उभा राहिल्याचे इतर मुलींनाही वाटू लागलेय.  त्यामुळे करिअरची नवी ‘पीच’ तयार झाली, असे भारतीय महिला संघाची मध्यमगती गोलंदाज व संघातील एकमेव गोमंतकीय खेळाडू असलेल्या शिखा पांडे हिला सुद्धा वाटते. 
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक उपविजेत्या संघाची सदस्य असलेल्या शिखा पांडे हिचे शुक्रवारी दुपारी गोव्यात आगमन झाले. नवी दिल्लीतील ‘ग्रॅण्ड’ सोहळा आटोपून गोव्यात परतणाºया शिखाचे दाबोळी विमानतळावर स्वागत करण्यात आले.ती गोव्यात कधी आणि किती वाजता पोहचणार याबाबत मात्र गोपनीयता होती. त्यामुळे जीसीएच्या पदाधिकाºयांनाही तिच्या आगमनाबाबत माहिती नव्हती. जीसीएचे सीईओ प्रशांंत काकोडे मात्र तिच्या संपर्कात होते. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी तेच उपस्थित राहू शकले. उपस्थित चाहत्यांना शिखासोबत ‘सेल्फी’ काढण्याची संधी मिळाली. औपचारिक स्वागतानंतर  शिखा घरी पोहचली. त्यानंतर तिने ‘लोकमत’शी साधलेला संवाद...

मायभूमीत परतल्यानंतरच्या भावना कोणत्या?
- गेला महिनाभर आम्ही इंग्लंडमध्ये होतो. खूप व्यस्त कार्यक्रम होता. प्रचंड मेहनत केली. विश्वविजेतेपदाच्या समीप पोहचलो. हा प्रवास सोपा नव्हता. सगळ्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले. देशासाठी योगदान दिल्याबाबत अभिमान वाटतो. मायदेशात परतल्यानंतर जल्लोषी स्वागताने भारावले. सगळं काही अनपेक्षित. खूप खुश आहे.

चषकाच्या समीप पोहचल्यानंतर झालेला पराभव आणि त्यानंतर ड्रेसिंंग रुममधील वातावरण.. याबाबत काय सांगशील?
- दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज यांसारख्या संघांचा पराभव करून आम्ही फायनल गाठली. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. देशवासीयांच्या अपेक्षांचं ओझंही वाढलं होतं. ते साहजिकही आहे म्हणा.. मात्र फायनलमध्ये पराभवामुळे खूप निराशा झाली. ड्रेसिंंग रुममध्ये काही वेळ सन्नाटा होता. आम्ही कुणाशीच बोललो नाही. एकटेपणा वाटत होता. मात्र, भारतात काहीतरी घेऊन जात असल्याचेही समाधान वाटत होते. 

फायनलमधील कामगिरीवरून संघ ‘मेंटली स्ट्रॉँग’ नव्हता असं वाटतं?
- नाही. असं मला वाटत नाही. प्रत्येक खेळाडू मनाने पक्की होती. त्यासाठी आम्ही खास अभ्यासही केला होता. पण कधीकधी आपल्या बाजूने काही गोष्टी घडत नसतात.  सामन्यात हरमनप्रीत आणि पूनम राऊत यांनी उत्तम खेळ करीत भागीदारी केली होती. मात्र, तळातील फलंदाजांना अपयश आले. आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवीपणे आम्ही पराभूत झालो. पराभवाचे शल्य आहेच.

तुझे प्रेरणास्थान कोण? झुलन की मिताली?
- मी मध्यमगती गोलंदाज असल्याने अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी हीच माझी प्रेरणास्रोत आहे. तिच्यासोबत घालवलेला वेळ माझ्या करिअरसाठी सर्वाेत्तम आहे. झुलन कशी घडली हे मी तिच्याकडून ऐकले आहे. नक्कीच ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. खेळावरील प्रचंड श्रद्धा, विश्वास, जिद्द, समर्पण, मेहनत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिची फिटनेससाठीची तळमळ या गोष्टी माझ्यासाठी खूप मोलाच्या व मार्गदर्शक आहेत. याबाबत मी स्वत:ला भाग्यवान मानते.

मितालीने पुढील विश्वचषक न खेळण्याचे संकेत दिले त्याबाबत... 
- एक सर्वाेत्तम कर्णधार आम्हाला मिळाली. तिच्या मार्गदर्शनाखाली नवख्या संघाने इथपर्यंत मारलेली भरारी गौरवास्पद आहे. वन डे क्रिकेटमधील टॉपवर असलेल्या मिताली राजसोबत खेळणे ही कल्पना आजही माझ्यासाठी मोठी आहे. तिच्यासोबत खेळत राहावे असे वाटते. तिच्या निवृत्तीबाबत सांगायचे झाल्यास.. सध्यातरी ती संघासोबतच असेल.विश्वचषकाला खूप वेळ आहे.

दिल्लीत बीसीसीआयकडून झालेल्या भव्य सत्कार समारंभाबाबत काय सांगशील?
- भारतात परतल्यानंतर नवी दिल्ली येथे भव्य सत्कार समारंभ होईल, याची अपेक्षा कुणीही केली नव्हती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटपटूंचा केलेला हा गौरव सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला. विश्वचषकासाठी बीसीसीआयने सुद्धा मेहनत घेतली. त्यांनी सर्वाेत्तम सोयी पुरवल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून काय वाटले?
- आम्ही पंतप्रधानांना भेटणार, या कल्पनेने खुश आणि उत्साही होतो. त्यांना भेटण्याची संधी मिळेल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, बीसीसीआयमुळे हे शक्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघातील प्रत्येक खेळाडूची विचारपूस केली. त्यांनी प्रत्येकीची भेट घेतली. मुलींनी त्यांच्यासोबत फोटो काढले. ‘आपने करोडो लोगों का दिल जीत लिया’ अशी शाबासकी पंतप्रधानांनी दिली. मी स्वत: त्यांना शेकहॅण्ड केला. प्रत्यक्षात होणारी ही भेट कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि नवी ऊर्जा सुद्धा देईल. क्रीडा मंत्री विजय गोयल आणि बीसीसीआयच्या पदाधिकाºयांनीही आमचा गौरव केला. खूप आनंद वाटतोय. 

आता पुढचे घ्येय..?
- भारतीय क्रिकेट संघाकडून पुन्हा विश्वचषक खेळायला मिळावा, हे माझे सर्वात मोठे ध्येय आहे. या विश्वचषकातून खूप काही शिकायला मिळाले. कामगिरीत अधिक सुधारणा करून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. झुलनसारख्या गोलंदाजाकडून मिळालेल्या टिप्स स्मरणात राहतील आणि निश्चितपणे, ध्येय गाठता येईल, असा विश्वास आहे. 

Web Title: maulainsaathai-ataa-karaiaracai-navai-paica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.