बंगळुरु : ग्लेन मॅक्सवेल याने झळकावलेल्या तुफानी नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा दुसऱ्या व अखेरच्या टी२० सामन्यात ७ गड्यांनी पराभव केला. या धमाकेदार विजयासह कांगारुंनी २ सामन्यांची मालिका २-० अशी निर्विवादपणे जिंकली. भारताने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १९.४ षटकातच ३ बाद १९४ धावा केल्या. मॅक्सवेलने ५५ चेंडूत ७ चौकार व ९ षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद ११३ धावांचा तडाखा दिला.
एम. चिन्नास्वामी स्टेडियवर नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियान कर्णधार अॅरोन फिंच याने भारताला फलंदाजीस निमंत्रित केले. सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या कांगारुंची यावेळी कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांनी मजबूत धुलाई झाली. मात्र, मॅक्सवेलने आपल्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीयांची मजबूत धावसंख्या माफक ठरविली. भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्टेÑलियाची सुरुवात अडखळती झाली. मार्कस स्टोइनिस (७) आणि कर्णधार अॅरोन फिंच (८) स्वस्तात परतले. यावेळी भारतीय संघ पकड मिळवणार असेच चित्र होते. मात्र, डी’अॅर्सी शॉर्ट (४०) आणि मॅक्सवेल यांनी तिसºया गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी करत आॅस्टेÑलियाला पुनरागमन करुन दिले. शॉर्टने २८ चेंडूत ६ चौकारांसह ४० धावा केल्या. विजय शंकरने शॉर्टला बाद करुन ही जोडी फोडली खरी, मात्र त्यानंतर मॅक्सवेलने आक्रमक पवित्रा घेत वादळी फटकेबाजी करताना आॅस्टेÑलियाच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला.
तत्पूर्वी, विराट कोहलीची झंझावाती फटकेबाजी आणि सलामीवीर लोकेश राहुलने करुन दिलेली आक्रमक सुरुवात या जोरावर भारताने ४ बाद १९० धावांचा डोंगर उभारला. कोहलीने केवळ ३८ चेंडूत २ चौकार व ६ षटकरांचा वर्षाव करताना नाबाद ७२ धावांचा तडाखा दिला. राहुलने २६ चेंडूत ४७ धावा कुटताना भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. रोहित शर्माच्या जागी स्थान मिळालेल्या शिखर धवनला (१४) अपेक्षित खेळी करता आली नाही. मात्र, दुसºया टोकाने राहुलने चौफेर फटकेबाजी करताना कांगारुंना चोपले. त्याने ३ चौकार व ४ षटकारांसह आपली खेळी सजवली. पुन्हा एकदा त्याच्या आक्रमकतेपुढे कोहली प्रेक्षकाच्या भूमिकेत गेला.
राहुलचे अर्धशतक ३ धावांनी हुकले. नॅथन कुल्टर-नाइलने त्याला बाद केले. राहुल पाठोपाठ रिषभ पंत (१) देखील बाद झाल्याने भारताचा डाव ३ बाद ७४ असा घसरला. सलग दुसºया सामन्यात पंत अपयशी ठरल्याने त्याच्यावर आता दबाव वाढला आहे. यानंतर कोहलीने सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना अनुभवी महेंद्रसिंग धोनीसह भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली.
दोघांनी चौथ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाला चोपून काढत त्यांची लय बिघडवली. दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील संथ खेळीमुळे टीकेला सामोरे गेलेल्या धोनीने यावेळी २३ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांची आतिषबाजी करताना टीकाकारांना गप्प केले. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर धोनी परतल्यानंतर दिनेश कार्तिकने ३ चेंडूत २ चौकारांसह नाबाद ८ धावा करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. (वृत्तसंस्था)