मेलबर्न : आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने शुक्रवारी बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार या संघाकडून खेळताना ब्रिस्बेन हीटविरुद्ध ३९ चेंडूत तडाखेबंद ८३ धावा केल्या. आयपीएलच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी मॅक्सवेलसाठी १०.७५ कोटी रुपये मोजले आहेत. त्याने या धडाकेबाज खेळीतून पंजाबने आपल्यावर दाखविलेला विश्वास एकप्रकारे सार्थ ठरविला.
मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने क्रिकेटमधून विश्रांती घेऊन पुनरागमन करणाऱ्या मॅक्सवेलने धुवाँधार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना २३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार संघाने ब्रिस्बेन हीटसमोर विजयासाठी १६८ धावांचे आव्हान ठेवले. किंग्ज इलेव्हन किंग्ज इलेव्हन पंजाब संघानेही त्याच्या या आक्रमक खेळीचे कौतुक केले आहे. मॅक्सवेल २०१४ ते २०१७ या काळात पंजाबकडून खेळत होता. २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी केले होते. मागील वर्षी त्याने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
टी२० क्रिकेटमध्ये आपल्याला धोकादायक फलंदाज म्हणून का म्हटले जाते हे मॅक्सवेलने यावेळी सिद्ध केले. निक मॅडिनसन (८), मार्कस स्टोइनिस (१६) आणि हिल्टन कार्टराइट (१८) हे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मैदानात आलेल्या मॅक्सवेलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत सामन्याचे चित्र पालटले. दोनशेहून अधिक स्ट्राईक रेटने फटकेबाजी केलेल्या मॅक्सवेलने बघता बघता मेलबर्न संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेल बाद झाला.
यानंतर धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीट संघाला २० षटकात ८ बाद १४५ धावांचीच मजल मारता आली. लेगस्पिनर अॅडम झम्पा याने ३० धावांत ३ खंदे फलंदाज बाद करत ब्रिस्बेन संघाला रोखले. सलामीवीर टॉम बँटन याने ३६ चेंडूत ६ चौकार व ४ षटकरांसह ६४ धावांची वेगवान खेळी केली. परंतु, त्याला सहकारी फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. मॅट रेनशॉ याने संघाकडुन दुसºया क्रमांकाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करताना ३० चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ३९ धावा केल्या.
त्याचवेळी झम्पाच्या लेगस्पिनपुढे ब्रिस्बेनचे फलंदाज चाचपडत खेळले. डॅनियल वॉरल आणि हॅरिस रौफ यांनीही प्रत्येकी २ बळी घेताना ब्रिस्बेन संघाला ठराविक अंतराने धक्के दिले. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आवश्यक धावगती वाढत गेल्याने दडपणाखाली आलेल्या ब्रिस्बेनच्या फलंदाजांकडून अनेक चुका झाल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाल्याने मेलबर्न संघाने सामन्यावर घट्ट पकड मिळवत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. (वृत्तसंस्था)ा
Web Title: Maxwell's explosive played after the IPL auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.