Join us  

मयंकच्या निर्णयाने बेयरस्टोचे नशीब फळफळले; सलामीला उतरण्याची संधी दिली

‘स्वत: मधल्या फळीत खेळून सलामीला इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोला खेळविण्याचा पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल याचा निर्णय अचूक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 9:00 AM

Open in App

मुंबई : ‘स्वत: मधल्या फळीत खेळून सलामीला इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोला खेळविण्याचा पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल याचा निर्णय अचूक ठरला. कर्णधाराच्या बलिदानामुळे बेयरस्टोचे नशीब फळफळले. बेयरस्टो आयपीएलमध्ये सलामीवीराच्या भूमिकेचा आनंद लुटत आहे.

बेयरस्टोने अलीकडे इंग्लंडसाठी अनेक सामन्यात सलामीवीराची भूमिका बजावली नव्हती. शुक्रवारी त्याने २९ चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह ६६ धावा ठोकल्या. यामुळे पंजाबने आरसीबीचा ५४ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर  बेयरस्टो म्हणाला, ‘सलामीला खेळण्याबाबत मी ताळमेळ बसविला. त्यात यश आले. आयपीएलसाठी उशिरा दाखल झाल्यानंतर मधल्या फळीत फलंदाजी करीत होतो. त्यात यश न आल्याने कर्णधार मयंकने स्वत: मधल्या फळीत खेळून मला सलामीला उतरण्याची संधी दिली.  गुजरातविरुद्ध तर मी एक धाव काढून बाद झालो, मात्र नंतर राजस्थानविरुद्ध ५६ आणि आरसीबीविरुद्ध ६६ धावा केल्या.’

मागील दोन वर्षांत बेयरस्टोने इंग्लंडकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेकदा मधल्या फळीत फलंदाजी केली.  मात्र काही सामन्यात सलामीलादेखील खेळला होता.  जोस बटलर नसला की बेयरस्टो यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळतो. तो म्हणाला, ‘इंग्लंडकडून खेळणे आणि लीग खेळणे यात मोठा फरक आहे.  इंग्लंडसाठी मधल्या फळीत माझी भूमिका वेगळी असते.  येथे मात्र डावाची सुरुवात करताना फार मजा येते. तुम्ही माझी आकडेवारी पाहू शकता.’

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App