नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघामुळे बरेच वाद झाले आहेत, पण या संघात एक असा नवा शिलेदार आहे जो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीपेक्षाही भारी ठरला आहे.
स्थानिक सामन्यांतील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळते. मयांक अगरवालने 2017-18 या मोसमामध्ये तब्बल दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंत स्थानिक क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करण्याचा पराक्रम कुणालाही करता आलेला नाही. यापूर्वी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. श्रेयसने 2015-16 या मोसमामध्ये 1947 धावा केल्या होत्या. मयांकने 2141 धावा करत श्रेयसचा विक्रम मोडीत काढला आहे.
मयांकने विजय हजारे स्पर्धेदरम्यान दोन हजार धावा पूर्ण केल्या. या स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये मयांकने 90.73च्या सरासरीने 723 धावा केल्या होत्या, यामध्ये तीन शतकांसह चार अर्धशतकांचा समावेश होता.