KAR vs KER | नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालने आक्रमक खेळी केली. सध्या या स्पर्धेत केरळ आणि कर्नाटक यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मयंक अग्रवालने 360 चेंडूत 208 धावा करत कहर केला. मयंकने आपल्या डावात एकूण 17 चौकार आणि 5 षटकार मारले. म्हणजेच या सलामीवीर फलंदाजाने चौकार आणि षटकारांच्या जोरावर 98 धावा कुटल्या. खरं तर मयंक अग्रवाल कर्नाटकच्या संघाचे नेतृत्व करत आहे.
भारतीय संघाचा ठोठावला दरवाजा31 वर्षीय मयंक अग्रवाल बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 12 मार्च 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध भारतीय जर्सीमध्ये खेळला होता. या सामन्यात तो विशेष काही करू शकला नाही आणि एकूण 26 धावा करून तो बाद झाला, त्यामुळेच त्याला वगळण्यात आले. पण आता त्याने देशांतर्गत स्पर्धेत चांगले पुनरागमन करत आपली गमावलेली लय पुन्हा मिळवली आहे.
पंजाब किंग्जने केले होते रिलीज मागील वर्षी आयपीएलमध्ये मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवत होता. पण मागील हंगामात संघाची कामगिरी काही खास राहिली नाही. मयंकच्या नेतृत्वाखाली पंजाबने स्पर्धेत 14 पैकी केवळ 7 सामने जिंकले, ज्यामुळे पंजाबच्या संघाला पहिल्या चारमध्ये स्थान मिळवता आले नाही. याच कारणामुळे व्यवस्थापनाने मयंकला लिलावापूर्वी रिलीज केले होते.
मयंक आता हैदराबादच्या ताफ्यात आयपीएलच्या मिनी लिलावात मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने 8.25 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. त्याची बेस प्राइज 1 कोटी एवढी होती. 2022च्या आयपीएलमध्ये मयंक अग्रवालने 13 सामन्यांत एकूण 196 धावा केल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"