नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल मागील मोठ्या कालावधीपासून भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. आंतरराष्ट्रीय संघात निवड न झालेल्या मयंकने रणजी ट्रॉफीत द्विशतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रवालने सौराष्ट्रविरूद्ध द्विशतक ठोकून भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे.
मयंक अग्रवालची शानदार खेळी दरम्यान, मयंक अग्रवालने चिन्नास्वामी स्टेडियमवर 429 चेंडूत 249 धावांची द्विशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 28 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश राहिला. म्हणजेच त्याने अवघ्या 33 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने तब्बल 142 धावा कुटल्या. खरं तर रणजी ट्रॉफीत सध्या कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यात सामना खेळवला जात आहे. कर्नाटकचा संघ अडचणीत असताना मयंकने शानदार खेळी करून डाव सावरला. कर्नाटकचा निम्मा संघ (5 गडी) केवळ 112 धावांवर तंबूत परतला होता.
मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफीच्या या हंगामात कर्नाटकसाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. मयंकने 2022 साली भारत आणि श्रीलंका यांच्यात भारतीय संघातून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. याशिवाय मयंकला बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आलेले नाही. 2020 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा वन डे सामना खेळला होता.
IPLमध्ये मयंक SRHच्या ताफ्यात आयपीएलच्या मिनी लिलावात मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 8.25 कोटीमध्ये खरेदी केले. अग्रवालची आयपीएलच्या लिलावासाठी मूळ किंमत 1 कोटी रूपये एवढी होती. मागील आयपीएल हंगामात अयशस्वी ठरलेला अग्रवाल आगामी हंगामात चमक दाखवणार का हे पाहण्याजोगे असेल. 2022 च्या आयपीएल हंगामात मयंक अग्रवालने आयपीएलमध्ये 13 सामन्यांत एकूण 196 धावा केल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"